बाबासाहेेेेब धुुमाळ
वैजापूर : शहरासह तालुक्यातील अनेक गावांत अवैध धंद्यांना जोर आला असून, त्याकडे पोलीस यंत्रणेचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. गावात मटका, पत्त्यांचे अड्डे, दारू आणि गुटख्याची सर्रासपणे विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. याशिवाय अवैधरीत्या चालणाऱ्या दारूच्या दुकानाशेजारी मटक्याचे अड्डे, खंडाळ्यात चहा टपरीच्या दुकानात खुलेआम मटका लावण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. वैजापूर तालुक्यातील तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असे अवैध धंदे सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.
तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांचे स्टिंग करण्यात आले. यात खंडाळा, शिऊर, वीरगाव, महालगाव, बोरसर, परसोडा, बिलोनी, लोणी खुर्द, तलवाडा, वाकला आदी भागांत अवैध धंदे बोकाळले असून मटका, पत्त्यांचे अड्डे, दारू, गुटख्याची सर्रासपणे विक्री होत आहे. खंडाळा बसस्थानकच्या पाठीमागील भागात खुलेआम मटका घेताना व चिट्ठी लिहिताना नागरिक आढळून आले. याशिवाय काही तळीराम खंडाळ्यातील हाॅटेलमध्ये दारू पीत असल्याचे दिसून आले. याच ठिकाणी मटका पण सुरू होता. वैजापूर तालुक्यात अवैध धंदे खुलेआम चालू असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
गेल्या काही दिवसांतील मटका, पत्ते, दारू व अवैध गुटखा विक्रीच्या दाखल गुन्ह्यांची संख्यासुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे अनेक भागांत अवैध धंद्यांना ऊत आला आहे. औरंगाबाद पोलिसांच्या पथकाने अनेक वेळा वैजापूर तालुक्यातील छापे टाकून अवैध धंद्यांवर ठोस कारवाई केल्याची उदाहरणे आहेत. मात्र, स्थानिक स्तरावरील पोलीस यंत्रणा याकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे.
-- कॅप्शन :
खंडाळा बसस्थानक भागात खुलेआम मटका घेताना नागरिक.