वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील बंद पडलेल्या कंपनीत शुक्रवारी (दि.९) बेकायदेशीररीत्या कटर मशीनच्या साहाय्याने नऊ झाडांची बेकायदेशीररीत्या कत्तल करण्यात आली. या वृक्षतोडीची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ( Illegal tree cutting in closed company)
वाळूज एमआयडीसीतील भूखंड क्रमांक ए-१३ मधील एक कंपनी अनेक दिवसापासून बंद आहे. या कंपनीत काहीजण कटर मशीनच्या साहाय्याने झाडे तोडत असल्याचे कामगार व उद्योजकांना दिसल्याने त्यांनी याची माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांना दिली. त्यांनी सहायक अभियंता अरुण पवार, भवर यांना घटनास्थळाची पाहणी करण्यास सांगितले. यानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दुपारी ४ वाजता या कंपनीत पाहणी केली. जवळपास नऊ डेरेदार झाडे तोडल्याचे दिसून आले. घटनास्थळी झाडाच्या फांद्या, खोड दिसले. काही तोडलेली झाडे वाहनातून लांबविल्याचे आढळले. यावेळी कंपनीच्या नवीन बांधकामासाठी झाडांचा अडसर ठरत असल्याने कंपनी मालक सुमित पगारिया यांच्या सांगण्यावरून झाडे तोडल्याचे त्रिभुवन या बांधकाम ठेकेदाराने सांगितल्याची माहिती एमआयडीसीचे सहायक अभियंता पवार यांनी दिली.
झाडाची कत्तल करणारे पसारप्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच झाडे तोडणाऱ्यांनी कटर मशीन व झाडे तोडण्याची अवजारे सोबत घेऊन कंपनीतून पसार झाले. यानंतर सहायक अभियंता अरुण पवार यांनी कंपनी मालक पगारिया यांच्याशी संपर्क साधत झाडे तोडण्याची परवानगी असल्याची विचारणा केली. त्यांनी परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. या बेकायदेशीर वृक्षतोडप्रकरणी कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांना अहवाल पाठविणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
स्वच्छ व हरित उद्योगनगरी उपक्रमाला खोएमआयडीसी प्रशासन व उद्योजक संघटनाच्या मदतीने गत पाच ते सहा वर्षांपासून वाळूज एमआयडीसीत ‘स्वच्छ व हरित एमआयडीसी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत उद्योगनगरीतील मोकळे भूखंड, रस्ते व कंपन्याच्या आवारात जवळपास एक लाख झाडे लावण्यात आलेली आहे. मात्र अनेकदा चोरी-छुपे ग्रीन बेल्ट व कंपन्यातील झाडे बेकायदेशिररीत्या तोडली जात असल्याने स्वच्छ व हरित उद्योगनगरी उपक्रमाला खो देण्याचा प्रयत्न केला जात असल्याने पर्यावरणप्रेमीत नाराजीचा सूर उमटत आहे.