औरंगाबाद : मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातला असल्यामुळेच मला त्यांनी मराठवाड्याच्या राजधानी असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिल्याचे वक्तव्य करून पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी गुरुवारी आमदार संजय शिरसाट यांनाही एक प्रकारे डिवचले.
१३ ऑक्टोबर रोजी स्मार्ट सिटी कार्यालयातील बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत राज्यातील सद्य:स्थितीवरही भाष्य केले. मंत्रिपदासाठी वाट पाहून असलेले आ. शिरसाट यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही का? की फक्त तुम्हीच खास विश्वासातले आहात, म्हणूनच तुम्हाला मंत्री केले? असे भुमरे यांना पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी सावरती बाजू घेत पत्रकारांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न केला.
पालकमंत्री भुमरे म्हणाले, आम्ही सगळे ४० आमदार मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील आहोत. त्यांच्यावर आमचा विश्वास होता म्हणूनच आम्ही त्यांच्या सोबत गेलो. त्यांचाही आमच्यावर विश्वास आहे. आ. शिरसाट यांच्यावरदेखील मुख्यमंत्र्यांचा विश्वास आहे; मात्र सध्या ते ‘वेटिंग’वर आहेत, त्यांनाही मंत्रिपद नक्की मिळेल. सध्या मुंबईतील अंधेरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने आमची शिवसेना ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असल्याचे जाहीर केले असून, यापुढील निर्णय मुख्यमंत्री घेतील. आमचे नेते म्हणून त्यांना सर्वाधिकार आहेत.
जिल्ह्यासाठी सर्व काही मिळेलशहर पाणीपुरवठा योजनेतील जॅकवेलसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाईल. या योजनेचा १२ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. वॉटर ग्रीड योजनेत गंगापूर, पैठण, सिल्लोड, वैजापूर यांनादेखील पाणी मिळणार आहे. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू हाेईल. पहिल्या टप्प्यात सात कोटींचा निधी खर्च होईल. संगीत कारंजे व इतर सुविधा पूर्ववत केल्या जातील. जिल्ह्याला काही कमी पडू न देण्यासाठीच माझ्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविल्याचेही भुमरे यांनी सांगितले.