औरंगाबाद : मी आत्महत्या करतोय, मला माफ करा. माझ्या कामाचे पैसे भावाला द्या. अशी चिठ्ठी लिहून देवगिरी कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगाराने गुरूवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
रणजित दिगंबर पगारे असे मृताचे नाव असून तो ३० वर्षाचा होता. रणजित काही महिन्यांपासून महापालिकेच्या देवगिरी कोविड केअर सेंटरमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. तेथेच अन्य कामगारांसह एका खोलीस राहायचा. गुरूवारी स. ८ वाजेच्या सुमारास त्याने बेडशीटने पंख्याला गळफास घेतल्याचे कामगारांनी पाहिले. भाऊ विशाल पगारे आणि विजय जनार्दन पगारे यांनी त्याला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले असता अपघात विभागाच्या डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रणजितला त्याच्या कामाचे पैसे दिले नव्हते. त्यांनी जर त्याचे बिल दिले असते तर त्याने आत्महत्या केली नसती, असा आरोप एमआयएमचे पदाधिकारी अरूण बोर्डे यांनी केला आहे.
घटनास्थही पोलीसांनी सुसाईड नोट सापडली असून मी आत्महत्या करतोय, मला माफ करा. माझ्या कामाचे बिल एक महिन्यानंतर भोंबे साहेब देणार आहेत. ही रक्कम माझ्या भावाला द्या. माझ्या आत्महत्येस कुणीही जबाबदार नाही, असे त्यात नमूद केलेले आहे.