छोट्या पडद्यावर ‘कसौटी जिंदगी की २.’ ही मालिका अतिशय लोकप्रिय ठरली होती. यातील अनुराग बासूची भूमिका साकारणारा अभिनेता पार्थ समथान सर्वांत जास्त चर्चेत होता. तो सध्या वेबसिरीजच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. मात्र, छोट्या पडद्यावरील करिअर लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्याने या विश्वापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला आहे. तो म्हणाला, ‘वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करून मला आनंद झाला आहे. त्यामुळे आता मी टेलिव्हिजन विश्वापासून ब्रेक घेणार आहे. जेव्हा मी पहिला शो केला तेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये नवीन होतो; पण कसोटी जिंदगी की, ही मालिका केल्यानंतर सगळे काही बदलले.’
शितलीच्या ‘लग्नाची पिपाणी’
अभिनेत्री शिवानी बावकरने ‘लागीर झालं जी’ या मालिकेतील शितली या भूमिकेमुळे अनेकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील तिचा वेगळा अंदाज प्रेक्षकांच्या मनावर जादू करत होता. आता ही शितली पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या चर्चा शिवानीचा नवा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाल्यामुळे सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत लग्नाची अनेक गाणी आली, त्यातली काही प्रचंड लोकप्रियही झाली. आता त्यात आणखी एका नव्या गाण्याची भर पडणार आहे. मधुर मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या “लग्नाची पिपाणी” या नव्या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. सचिन कांबळे आणि शिवानी बावकर ही नवी जोडी या गाण्यात दिसत आहे.
प्रदर्शनापूर्वीच ‘गंगूबाई काठियावाडी’ वादात
‘गंगूबाई काठियावाडी’ या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कथेवर आक्षेप घेण्यात आला आहे. या चित्रपटात निर्मात्यांनी कामाठीपुराच्या २०० वर्षांच्या इतिहासाशी छेटछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आमच्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा कामाठीपुरा येथे राहणाऱ्या काही रहिवास्यांनी केला आहे. तसेच ‘कामाठीपुरा की आवाज’ नावाच्या एका या संघटनेने चित्रपटाविरोधात आवाज उठवला आहे. कामाठीपुराचा इतिहास बदलण्यासाठी येथील लोकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. हा चित्रपट येथील वर्तमानावर परिणाम तर करेलच; पण भावी पिढीवर देखील याचा प्रभाव पडेल, असे ते म्हणाले.