औरंगाबाद: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक फोटो 'विराट सभेचा formula ?' असे ट्विट करत बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी पैसे वाटल्याचा आरोप केला. यावर माजी खासदार खैरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून भाजपच्या लोकांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले. तर नितेश राणे खोटारडा आहे, मी त्याच्या बापाच्या वयाचा आहे, असेही खैरे यांनी यावेळी ठणकावले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या १ मे रोजीच्या सभेनंतर शिवसेनेने त्याच मैदानावर विक्रमी सभा घेण्याच्या जाहीर केले होते. दरम्यान, शहरातील पाणी प्रश्नावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने शिवसेना विरोधात मोर्चा काढला. यामुळे बुधवारी ८ जून रोजी मराठवाड्यात औरंगाबाद येथील पहिल्या शिवसेना शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सभेची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शहरात भरगच्च सभा झाली. शिवसेनेने ही सभा विक्रमी झाली असून आम्ही स्वतःचाच विक्रम मोडला असल्याचे दावा केला. सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषणातून केलेली चौफेर फटकेबाजीची चर्चा सुरु असतानाच भाजपने सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवली असा आरोप केला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक फोटो आणि 'विराट सभेचा formula ?' असे ट्विट करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे नागरिकांना पैसे वाटत असल्याचा दावा केला. यावर खैरे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत भाजपवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितले. मी नितेश राणेच्या बापाच्या वयाचा आहे, तो आणि भाजप खोटारडे असून ते कधीच सत्तेत येणार नाहीत, असा संताप खैरे यांनी व्यक्त केला.
मनसेने देखील केला पैसे वाटल्याचा दावादरम्यान, उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर मनसेच्या नेत्यांनी टिका करायला सुरुवात केली आहे. सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा ही लवंगीची फुसकी माळ निघाल्याचं म्हटलं आहे. तर, सभेच्या गर्दीवरुन मनचिसेच्या अमेय खोपकर यांनी निशाणा साधला आहे. 'हिंदुंचा खरा नेता म्हणजे फक्त आणि फक्त राज ठाकरे. मुख्यमंत्री यांची सभा बघा, मागे सर्व खुर्च्या आणि उभा राहायला जागाचं जागा, सभा सुरू असताना लोक घराकडे रवाना, नाद करायचा पण मनसेचा नाही, जय हिंदुराष्ट्र ! असे म्हणत खोपकर यांनी सभेला गर्दी कमी होती, असे म्हटलं आहे.