संजय तिपाले, बीड‘एक सुराग पुलीस को गुनाह की तह तक ले जाता है’ हे पोलीस यंत्रणेच्या यशाचे गमक सांगणारे वाक्य प्रसिद्ध आहे. गेवराई तालुक्यातील १५ लाख रुपयांच्या लूट प्रकरणाचा अवघ्या १२ तासांत छडा लागला तो देखील अशाच एका ‘क्ल्यू’ने! अप्पर अधीक्षकांच्या जीपवरील चालक राजेंद्र सांगळे यांनी आरोपींचे वर्णन ऐकले अन् क्षणार्धात नजरेसमोरुन गेलेल्या आरोपींची माहिती दिली. त्यावरून तपासाला तर दिशा मिळालीच; पण खाकी वर्दीत सारथ्याची भूमिका निभावणाऱ्यांचीही प्रतिमा उंचावली.गेवराई तालुक्यातील धोंडराई फाट्यावर १४ जुलै रोजी स्टेट बँक आॅफ हैद्राबादचे १५ लाख रुपये मिनी रिक्षा आडवून सिनेस्टाईल लंपास केले होते. याचदरम्यान उमापूर येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणाच्या चौकशीसाठी बीडचे अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे हे जात होते. गेवराई- शेवगाव रस्त्यावरील गोपाळवस्तीकडे जाणाऱ्या पाणंदरस्त्याजवळ एक दुचाकी चुकीच्या दिशेने आली व कलुबर्मे यांच्या जीपला ओव्हरटेक करुन सुसाट निघून गेली. क्षणार्धात घडलेला हा प्रसंग कलुबर्मे यांचे चालक राजेंद्र सांगळे यांच्या नजरेतून सुटला नाही. पाच मिनिटांनी कलुबर्मे यांना धोंडराई फाट्यावरील रोकड लुटीच्या घटनेबाबत कळाले. भ्रमणध्वनीवरील संवादावरुन दोन तरुण बँकेची १५ लाखांची रोकड असलेली पेटी घेऊन पळाल्याचे सांगळेंना कळाले. त्यांना लगेचच चुकीच्या मार्गाने ओव्हरटेक करुन पाणंदरस्त्याने भरधाव गेलेल्या दुचाकीवरील दोन तरुण आठवले. गाडी लाल रंगाची व विनाक्रमांकाची होती, त्या दोघांच्यामध्ये पेटीही होती, अशी खात्रीशीर माहिती त्यांनी कलुबर्मे यांना दिली. रोकड लुटणाऱ्यांचे वर्णन मिळते- जुळते असल्याने कलुबर्मे यांनी चोर ज्या रस्त्याने गेले, तिकडे गाडी घेण्यास सांगितले; परंतु पाणंदरस्ता असल्याने चारचाकी गाडी जाणे शक्य नव्हते. कलुबर्मे यांनी तोपर्यंत अहमदनगर, जालना येथील पोलिसांनाही आरोपींचे वर्णन सांगून नाकाबंदी करण्यास सांगितले. गुन्हे शाखा व गेवराई ठाण्याचे पोलीस तोपर्यंत घटनास्थळी पोहोचले होते. त्यांना कलुबर्मे यांनी गोपाळवस्तीच्या दिशेने रवाना केले. शोधमोहीम राबविल्यानंतर अखेर लाल रंगाची दुचाकी आढळली. शंकर शेंडगे, ऋषीकेश महानोर यांनाही पोलिसांनी पकडले. खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली तर दिलीच शिवाय झाडाच्या बुडाला गवतात लपवून ठेवलेले १५ लाख रुपयेही काढून दिले. चालक सांगळे यांच्या नजरेतून आरोपी सुटले असते तर कदाचित ते मिळणे अवघड बनले असते. पोलीस दलात चालकपदावर काम करणारे कर्मचारी दुर्लक्षित असतात. त्यामुळे कर्मचारी चालकाचे काम करण्यास उदासीन आहेत. मात्र, चालकपदावर राहूनही खात्याची इभ्रत वाढविणारे कर्तव्य निभावता येते, हे सांगळे यांनी दाखवून दिले.
‘दिशा’दर्शक ‘क्ल्यू’ने उंचावली पोलिसांची प्रतिमा
By admin | Published: July 18, 2016 12:37 AM