औरंगाबाद : भारतीय हवामानशास्त्र विभागाचा (आयएमडी) यंदा अंदाज चुकला असून, मान्सूनपूर्व पावसालाच या विभागाने मान्सून पाऊस ठरविण्याचा प्रयत्न केला; परंतु अद्यापही मान्सून सक्रिय झालेला नाही. त्यामुळे मान्सून ‘ब्रेक’ जाहीर करण्याची वेळ हवामान विभागावर आली. प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात मान्सून सक्रिय होणार असल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जून महिन्याच्या गेल्या १७ दिवसांत राज्यात आठवडाभरापेक्षाही पाऊस झालेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तर जूनच्या पहिले दोन दिवसच पावसाने चांगली हजेरी लावली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जर केरळमधील आठ केंद्रांवर २.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर मान्सूनचे आगमन होते. दरवर्षी १० मे नंतर दक्षिणेतील मिनिकॉय, अमिनी, तिरुअनंतपुरम, पुनालूर, कोल्लम, अल्लापुझा, कोट्यम, कोची, त्रिसूर, कोझिकोडे, थालासेरी, कन्नुर, कुडुलू आणि मंगलोर या वेधशाळांच्या क्षेत्रापैकी किमान आठ ठिकाणी सलग दोन दिवस २.५ मि.मी. किंवा त्याहून अधिक पाऊस पडल्यास केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले, असे जाहीर केले जाते; परंतु यंदा सागर आणि मेकुणू या दोन वादळांच्या प्रभावाने केरळला जोरदार पाऊस झाला.
या पावसामुळे मान्सून आल्याची घोषणा हवामान विभागाने केली. वास्तविक राज्यात मान्सून आलेला नाही, असे भौतिकशास्त्रज्ञ, हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. मान्सूनच्या पावसात वीज आणि गडगडाट नसतो. ढगांचे पुंजकेदेखील दिसत नाहीत. पाऊस संततधार पडतो. मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर आभाळ काळ्या ढगांनी गच्च भरून येते. पावसाची सतत रिपरिप सुरू होते. मध्ये ऊनही पडत नाही. या सगळ्या गोष्टी सध्या दिसत नाहीत,असेही जोहरे यांनी सांगितले.
भाकीत खरे ठरेनाहवामान विभागाकडे अत्याधुनिक यंत्रणा आहे. परंतु तरीही भाकीत खरे ठरत नाही, अशी परिस्थिती आहे. अंदाज व्यक्त करताना हवामान खात्याने अशी माहिती दिली, असे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्ष माहिती देण्यासाठी अधिकारी आणि त्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. पाऊस कधी पडेल, हे अभ्यासकांना कळते; परंतु हवामान विभागाला कळत नसल्याची स्थिती आहे. दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल.- श्रीनिवास औंधक र, संचालक , खगोलशास्त्र विभाग, एमजीएम, औरंगाबाद
जुलैच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात मान्सून‘आयएमडी’ने पूर्वमान्सूनलाच मान्सूनचा पाऊस म्हटले; परंतु जुलैच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. गेली काही दिवस पडलेला पाऊस हा मान्सूनपूर्वच आहे. नाईलाजाने मान्सून ब्रेक जाहीर करण्याची वेळ हवामान खात्यावर आली आहे. मराठवाड्यात यंदा जवळपास ८५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.- किरणकुमार जोहरे, भौतिकशास्त्रज्ञ, हवामान अभ्यासक