लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड स्थानकात उपलब्ध असलेल्या यार्डची संख्या आणि गाड्यांची संख्या पाहता नवीन गाडी चालविणे शक्य नाही़ त्यामुळे उपलब्ध यार्डची लवकरच पुनर्ररचना केली जाईल, अशी माहिती दक्षिण -मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी दिली़ दक्षिण -मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी गुरूवारी गंगाखेड, परळी, परभणी आणि नांदेड रेल्वे मार्ग आणि स्थानकाची पाहणी केली़ दरम्यान, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ यावेळी नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अखिलेशकुमार सिन्हा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़ महाव्यवस्थापक यादव म्हणाले, सद्यस्थितीत नांदेड स्थानकात येणाऱ्या गाड्यांचे प्रमाण अधिक असून नव्याने गाड्या चालविण्यासाठी यार्डची संख्या वाढविणे गरजेचे आहे़ त्यासाठी येणाऱ्या काळात यार्डची पुनर्ररचना करून लांबी वाढविण्याबरोबरच यार्डची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत़ ज्यामुळे नांदेड-मुंबई, नांदेड-पुणे, नांदेड-नागपूर या मार्गावर गाड्या चालविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल़ नांदेड- मुंबई एक्स्प्रेस चालविण्यासाठी मध्य रेल्वेसोबत एकमत झाल्याचे यादव यांनी सांगितले़ यासाठी रेल्वे बोर्डाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़ परभणी-मुदखेड रेल्वे मार्गावर क्षमतेपेक्षा ६० टक्के अधिक गाड्या धावत आहेत़ त्यामुळे सध्या या मार्गावर नवीन गाडी चालविणे शक्य नाही़ मुदखेड - परभणी या मार्गाचे दुहेरीकरण डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होईल़ प्रारंभी यादव यांनी रेल्वे स्थानकावरील डाक विभाग, उपहारगृह, प्रवासी प्रतिक्षालय, सुरक्षेच्या बाबीचा आढावा घेतला़
स्थानकातील यार्डची लवकरच पुनर्ररचना
By admin | Published: June 22, 2017 11:30 PM