औरंगाबाद : परदेशी शिक्षणासाठी जवळपास जिल्ह्यातून ४०० विद्यार्थी जाणार असल्याने त्यांचे तत्काळ लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत दिली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्ण मृत्युदर अधिक असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे ३४५ रुग्ण असून, आजवर ६०८ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २०६ जण बरे, तर ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिस आजारात लागणाऱ्या इंजेक्शनच्या फेरवाटपाबाबत विचार करावा, याबाबत शासनाला कळविले आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणाबाबत प्रशासकीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला खासदार डॉ. भागवत कराड, जि. प. अध्यक्ष मीना शेळके, आमदार अंबादास दानवे, हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, अतुल सावे, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जि. प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, घाटी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. नीता पाडळकर, डॉ. उल्हास गंडाळ उपस्थित होते.
लोकप्रतिधींनी केलेल्या सूचना अशा
आमदार अतुल सावे : खासगी रुग्णालयातून लसीकरण करण्यास मुभा द्यावी.
आमदार संजय शिरसाट : म्युकरमायकोसिस आजारावर आवश्यक इंजेक्शनबाबत विभागीय पातळीवरून वाटप करण्याबाबत विचार होण्याची सूचना केली.
आमदार अंबादास दानवे : परदेशी शिक्षणासाठी जवळपास जिल्ह्यातून ४०० विद्यार्थी जाणार असल्याने त्यांचे तत्काळ लसीकरण करण्यात यावे.
खासदार डॉ. भागवत कराड : लॉकडाऊन काळातील व्यापाऱ्यांचा कर, वीज बाबत सवलत द्यावी.
आमदार हरिभाऊ बागडे : कोरोनावरील उपचार करताना रुग्णावर दुष्परिणाम होणार नाहीत, याची काळजी घेतली जावी.