औरंगाबाद : मराठवाड्यातील कापसावर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे व धान्य पिकांवरील तुडतुडे रोगामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश शासनाने विभागीय पातळीवर दिले आहेत. याप्रकरणी शासनाने सर्व प्रशासकीय विभागांना आदेश जारी केले आहेत. मराठवाड्यात अंदाजे १६ लाख ४८ हजार ५३८ हेक्टरवर कापूस पेरला गेला. त्यातील किती टक्के पिकांचा बोंड अळीने फडशा पाडला, ते पंचनाम्याअंती समोर येईल.
२०१७ च्या हंगामामध्ये कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकºयांना मदतीची मागणी करण्यात येत आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये कीड हल्ल्याचा समावेश आहे. ५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत पंचनामे करण्याचा निर्णय झाला आहे. वस्तुस्थिती विचारात घेतल्यानंतर यंदाच्या खरीप हंगामामध्ये कापूस व धान्य पिकांवर बोंड अळी व तुडतुडे रोग पडला. या पिकांचे काय नुकसान झाले त्याचे पंचनामे १० दिवसांत करण्यात यावेत. पंचनामे करीत असताना नुकसानग्रस्त शेतीचे जीपीएस इनेबल्ड फोटो मोबाईल अॅपच्या साह्याने काढण्यात यावेत. त्यामुळे कीड पडल्याचा दावा ग्राह्य धरण्यात येईल. नुकसान ठरविण्यासाठी पिकांची नोंद ७/१२ मध्ये असणे आवश्यक असेल. पंचनामे झाल्यानंतर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांच्या बाबतीत बाधित शेतक-यांना मदत देण्याबाबत सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करावा लागणार आहे.
मराठवाड्यात १६ लाख हेक्टरवर पेरणीमराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत अंदाजे १६ लाख हेक्टरवर कापसाची पेरणी झाली. त्यामध्ये औरंगाबादमध्ये साडेचार लाख हेक्टर, जालन्यात २ लाख ७९ हजार हेक्टर, बीडमध्ये ३ लाख ६१ हजार हेक्टर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ६ लाख हेक्टरवर कापसाची पेरणी झाली होती.