औरंगाबाद : राज्यसेवा मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा यासाठी काँग्रेसतर्फे राज्यभर आंदोलन छेडण्यात आले. शहरात महात्मा फुले चौकात सकाळी दहा ते १२ यादरम्यान विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करीत आंदोलन केले. यावेळी आंदोलन पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बघता काय सामील व्हा...,’ असे आवाहन आंदोलक विद्यार्थी करीत होते.
राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा जून २०२३ मध्ये आहे. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक असते. त्यामुळे पूर्व परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी वेळ लागतो. मात्र, एमपीएससीने कोणतीही पूर्व कल्पना न देता अभ्यासक्रम लागू करण्याचे घोषित केले. हा निर्णय लाखो विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने अभ्यास केल्याने बदललेल्या पॅटर्ननुसार वर्णनात्मक अभ्यासासाठी मिळालेल्या वेळात जुन्या पॅटर्ननुसार तयारी केलेले विद्यार्थी टिकाव धरणार नाहीत. नवीन पॅटर्न २०२५ मध्ये लागू केला, तर जुन्या पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दोन संधी मिळू शकतील. पॅटर्न लागू करण्याची घाई केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याबाबत आयोगाने पुनर्विचार करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांसह, पदाधिकाऱ्यांनी केली.
या आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, माजी जिल्हाध्यक्ष नामदेवराव पवार, किरण पाटील डोणगावकर, शेख युसूफ, डॉ. जफर खान, हनुमंत पवार, सागर साळुंके, निलेश आंबेवाडीकर, प्रतीक पाटील, मोहित जाधव, दीक्षा पवार, असित सरवदे, आकाश रगडे, विजय कांबळे, दीपाली मिसाळ, मंजू लोखंडे यांच्यासह स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. अकरानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.