औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाकडून वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही. मुख्यमंत्र्यांना रोखायचे असल्यास, पंढरपूर परिसरापासून दूरच रोखावे, असा निर्णय औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगण्यात आले आहे. नुकतेच वारीतील काही संघटनांचा वारकऱ्यांना इजा पोहोचविण्याचा डाव असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर, मराठा क्रांती मोर्चाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजातील आंदोलकांना बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे मराठा क्रांती मोर्चा औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांनी लोकमतशी बोलताना म्हटले आहे.
मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीनिमित्त होणारी विठ्ठलाची शासकीय पूजा न करू देण्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात विठ्ठलाची पूजा न करु देण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी 10 लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत, मी विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरात येणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर, लगेच मराठा क्रांती मोर्चाकडून वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मराठा समाज कटिबद्ध असून वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना अडवायचे झाल्यास, आम्ही पंढरपूरपासून दूरच्या अंतरावरच अडवू, पंढरपुरात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले आहे. मराठा आंदोलकांच्या नावाने काही समाजविघातक संघटनांकडून अपप्रचार आणि अनुचित प्रकार घडेल आणि त्याचे खापर मराठा समाजाच्या नावावर पडेल. मात्र, मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्र्यांना पंढरपूरापासून दूरच अडविले जाईल. वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ देणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे.