छत्रपती संभाजीनगर : टॅगिंग नसणाऱ्या जनावरांची १ जूनपासून खरेदी-विक्री करता येणार नाही. त्यामुळे जनावरांचे टॅगिंग झाले आहे का, झाले असेल, तर मालकांच्या आधार कार्डसोबत टॅगिंग क्रमांक लिंक आहे का, मयत झालेली, विक्रीनंतर बाहेरगावी गेलेली जनावरे याची पडताळणी करण्यासाठी जि. प. पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी गावोगावी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत.
जिल्ह्यात सन २०१९ नंतर पशुगणना झालेली नाही. तेव्हाच्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ५ लाख ३८ हजार ५७२ गायवर्ग, ९४ हजार ४३० म्हैसवर्ग, ४ लाख ३१ हजार १८२ शेळ्या, ८८ हजार २४४ मेंढ्या आणि वराह १० हजार ६४६ असे एकूण ११ लाख ६३ हजार ३४ जनावरे असून, सद्य:स्थितीत ८ लाख ९४ हजार जनावरांचे टॅगिंग झाल्याच्या नोंदी भारत पशुधन प्रणालीवर अपडेट करण्यात आल्या आहेत.
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये पशुधनास इअर टॅगिंग केल्यानंतर ऑनलाईन नोंदी घेण्यात येत आहेत. या नोंदी पशुवैद्यक हे पशुपालकाच्या गोठ्यात जाऊन जनावरांना करून घेणार आहेत. इअर टॅगिंगमुळे जनावरांच्या जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण, औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण या बाबी कळून येतात. एवढेच नाही, तर पशुधनाचे प्रजनन आरोग्य, मालकी हक्क, जन्म- मृत्यू, आदी माहिती उपलब्ध होणार आहे.
काय आहे इअर टॅगिंगइअर टॅगिंगमध्ये जनावरांच्या कानात पिवळ्या रंगाचा एक प्लास्टिक बिल्ला (टॅग) लावला जातो. त्यात त्या जनावरांची ओळख दर्शविणारा १२ अंकी क्रमांक असतो. या क्रमांकाच्या आधारे, पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी त्या जनावरांवर केलेले उपचार, लसीकरणाबाबत विविध नोंदी ऑनलाईन घेत असतात. या नोंदी भारत पशुधन पोर्टलवर अपलोड होत असतात. यापुढे पशुपालकांनी जनावरांची व्यवस्थित काळजी घेणे, विविध आजार, साथीच्या रोगापासून संरक्षण देणे, चोरी तस्करीपासून संरक्षण करणे, शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी या टॅगिंगचा फायदा होणार आहे.