औरंगाबाद : बहुप्रतीक्षित सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा ८४.४४ किमीचा रेल्वे मार्ग राज्य शासनाने ‘फास्ट ट्रॅकवर’ घेतला असून, मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मार्गासाठी राज्याच्या वाट्याचे ४५२ कोटी ४६ लाख रुपये आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी ४ वर्षांत हा मार्ग पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या मार्गावर रेल्वे धावणार आहे.
तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वे ट्रॅकवर आणण्याची मागणी १९६० पासून सुरू आहे. २००४-०५ या वर्षात सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद मार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळाली होती. तेव्हा सर्वेक्षणानुसार हा मार्ग ८० किमीचा आहे. त्यासाठी १५ वर्षांपूर्वी १८९ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. दरम्यान, पाठपुरावा थंडावला. त्यामुळे चर्चाच झाली नाही. मात्र, २०१४ नंतर या मार्गाच्या पुनर्सर्वेक्षणास मंजुरी मिळाली. पुन्हा सर्व्हे झाला तेव्हा हा प्रकल्प खर्च ९०० कोटींवर गेला. २०१९ मध्ये सोलापूर येथील भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुळजापूरमार्गे सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला सरकारने मंजुरी दिल्याचे जाहीर केले होते; परंतु भूसंपादन होण्याची प्रक्रिया निधीअभावी रेंगाळली. मात्र, अखेर राज्य शासनाने सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा ब्राॅडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर घेत निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उस्मानाबाद तुळजापूरमार्गे रेल्वेने सोलापूरशी जोडले जाणार आहे.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह दक्षिण भारताशी रेल्वे ‘कनेक्टिव्हिटी’पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण भारत यांना जोडला जाणारा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून सोलापूर -तुळजापूर-उस्मानाबाद हा रेल्वे मार्ग ओळखला जाणार आहे. दक्षिण भारतातून तुळजापूर येथे येणाऱ्या भाविकांना रेल्वेचीही कनेक्टिव्हिटी या मार्गामुळे आगामी कालावधीत मिळू शकणार आहे. रेल्वे मार्गातील लाइन मार्किंगचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले. रेल्वे विभागातील अधिकारी आणि भूमिअभिलेख कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच मोजणीचा अंतिम अहवाल भूसंपादन अधिकारी कार्यालयास सादर करण्यात येणार असून, त्यानंतर जमीनमालकाला भूसंपादनाचे पैसे मिळणार आहेत, असे रेल्वे प्रशासनाकडून समजते.
मंत्रिमंडळातील निर्णय- सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी ९०४ कोटी ९२ लाख इतका खर्च येणार. ५० टक्के राज्य शासनाचा सहभाग.- राज्य शासनाने आपल्या वाट्याचे ४५२ कोटी ४६ लाख रुपये आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय.-८४.४४ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावर १० रेल्वे स्थानके असतील.