छत्रपती संभाजीनगर : देशातील ४० वे सी-डॉप्लर रडार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील, खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथील अर्धा एकर जागेत बसविण्यात येणार आहे. केंद्रशासनाच्या पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाने यासाठी पूर्वीच मंजुरी दिली होती. गेल्या आठवड्यात रडारसाठी म्हैसमाळ येथे जागा मिळाली. ती जागा इंडियन मेट्रालॉजिकल डिपार्टमेंटला देण्यात आली आहे. साधारणतः मे २०२५ मध्ये याचे काम सुरू होईल. एक ते दीड वर्षात ते काम पूर्ण झाल्यानंतर रडारच्या सुमारे ४०० किमी रेंजमधील हवामानाची इत्यंभूत माहिती मिळेल. ज्यामुळे येथील शेतकरी, शेती, पशुधन संरक्षण होण्यास मदत होईल. अवकाळी पाऊस, तापमान, दुष्काळ, गारपीट, ढगफुटी, चक्री वादळाची माहिती रडारमुळे मिळू शकेल.
माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. डॉ. भागवत कराड आणि आयएमडीचे संचालक सुनील कांबळे यांनी शनिवारी रडारची तांत्रिक माहिती देताना अर्धा एकर जागा ताब्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. खा. डॉ. कराड यांनी लोकमतने मागील चार वर्षांपासून रडार बसविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख केला. केंद्रीय विज्ञान मंत्रालयाने सी बॅंड डॉप्लर रडार मंजूर केले आहे. म्हैसमाळ समुद्रसपाटीपासून ऊंच असल्याने तेथे रडार व इतर यंत्रणा असेल. वन विभागाने त्यासाठी जागा दिली आहे. मराठवाड्याच्या कृषी, औद्योगिक विकासाच्या अनुषंगाने रडारकडून मिळालेली माहिती महत्त्वाची असेल.
लोकमतच्या वृत्तामुळे पाठपुरावा केला...या रडारमुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रापर्यंतच्या हवमानाचे अचूक अनुमान मिळेल. शेतकऱ्यांना हवामान माहितीचा सर्वाधिक फायदा होईल. खुलताबाद-म्हैसमाळ या उंच ठिकाणी रडार बसविण्यासाठी आयएमडीने तयारी केली आहे. लोकमतने वृत्तमालिकेतून मराठवाड्याला रडारची का गरज आहे, हे समोर आणल्यामुळे मला केंद्रशासनाकडे पाठपुरावा करता आला.- डॉ. भागवत कराड, खासदार राज्यसभा
रडारमुळे उपाययोजना शक्यमुसळधार पाऊस, वीज, गडगडाटांसह विजा पडणे, वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट यांसारख्या घटनांच्या चार ते सहा तासांपूर्वी रडारमुळे सूचना मिळेल. जागतिक निविदेने रडार खरेदी होईल. मेड इन चायना रडार नसेल. हवामान बदलामुळे होणारे परिणाम व त्यासाठी करावे लागणारे उपाय रडारच्या माहितीमुळे करणे शक्य होईल. रडार अविरत कार्यान्वित असेल.- सुनील कांबळे, संचालक आयएमडी
किती खर्च येणार२० कोटी रडारला लागणार.२० कोटी पायाभूत सुविधांसाठी लागणार.
किती शास्त्रज्ञ असणार४ शास्त्रज्ञांची टीम म्हैसमाळ येथील केंद्रात असेल.६ सहायक कर्मचारी तेथे असतील.