छत्रपती संभाजीनगर :छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचे अभिमानस्थान आहेत. त्यांचा पराक्रम, दूरदृष्टी आणि युद्धनीती यांचे साक्षीदार आहेत हे गड-किल्ले. महाराष्ट्राच्या इतिहासात गड-किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि काही अत्यंत महत्त्वपूर्ण किल्ले मराठवाड्यातही आहेत. हे किल्ले शिवरायांच्या पराक्रमाची आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाची जणू आजही साक्ष देत आहेत.
मराठवाडा हा ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठवाड्यास गड-किल्ले, प्राचीन मंदिरे, दरवाजे अशा तब्बल १८० ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे. यात अनेक किल्लेदेखील असून, हे किल्ले केवळ डोंगरांवरील दगडी वास्तू नसून, ते शौर्य आणि पराक्रमाची गाथा सांगणारे जिवंत स्मारक आहेत. अनेक किल्ल्यांची आजही दुरवस्था आहे, तर काही किल्ल्यांना गतवैभव देण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे.
३६० किल्ले महाराजांशी संबंधितराज्यात ५५० गड-किल्ले आहेत. यापैकी ३६० किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित आहेत.
मराठवाड्यात १५ किल्लेमराठवाड्यात १५ किल्ले आहेत. यात दौलताबादचा देवगिरी, भांगसीमाता गड, अंतूर, कंधार, नळदुर्ग, परांडा, धारूर, औसा, वेताळवाडी, जंजाळा, सुतोंडा, उदगीर, पाथ्री (परभणी), परळी आणि माहूरच्या किल्ल्यांचा समावेश आहे.
मुलांना गड-किल्ले दाखवागड-किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, तरुणपिढी व मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा; तसेच आजचा समाज घडविण्यासाठी शिवचरित्र मार्गदर्शक आणि तितकेच प्रेरणादायी आहे. यातून एक चांगला समाज निर्माण होईल व पालकांनीदेखील शिक्षणाबरोबरच मुलांना ऐतिहासिक किल्ल्यांची आवड निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी मुलांना गड-किल्ले दाखवावेत, जेणेकरून गड-किल्ले हे मातीचे नुसते ढिगारे नसून, शिवस्पर्शाने पावन झालेले शिवतीर्थ आहेत, हे त्यांना समजेल. या शिवतीर्थांची (किल्ल्यांची) आवड मुलांमध्ये पालकांनी निर्माण करावी.- प्रा. साईप्रसाद कुंभकर्ण, इतिहास अभ्यासक.