औरंगाबाद : ''राज्यातून केंद्रीय मंत्री कोण होणार या चर्चेतही माझे नाव नव्हते अन अचानक मला पीएमओमधून फोन आला. दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) , भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ( J.P. Nadda ) यांची भेट झाली आणि त्यानंतर शपथविधी झाला,'' असा थक्क करणारा प्रवास उलगड होते केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड( Bhagwat Karad ). त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी एका बैठकीदरम्यान 'महत्वाच्या खात्याचे मंत्रीपद दिले आहे, कष्ट करावे लागतील' असे म्हटले. त्यावर मी डॉक्टर आहे, तुम्हाला निराश करणार नाही असा शब्द दिल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले. ते लोकमतचे एडिटर-इन -चीफ राजेंद्र दर्डा ( Rajendra Darda ) यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते. ( "Important ministerial posts have been given, we have to work hard"; Dr. Karad told what happened after the phone call from the PMO )
राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने औरंगाबाद शहराला पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळाले. भाजपकडून राज्यातून मंत्रीमंडळात कोण स्थान पटकावणार याची जोरदार चर्चा मंत्रीमंडळ विस्ताराच्या पूर्वी सुरु होती. परंतु, यात डॉ. कराड यांचे नाव नव्हते. सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवत डॉ. कराड यांची प्रधानमंत्र्यांनी अर्थ राज्यमंत्री पदी निवड केली. यामुळे सर्वांना डॉ. कराड यांची मंत्रीपदी निवड कशी झाली ? त्या दोन दिवसात काय घडले याची उत्सुकता आजही आहे. यावर आणि औरंगाबाद तसेच महाराष्ट्रासाठीच्या व्हिजनवर लोकमतचे एडिटर-इन -चीफ राजेंद्र दर्डा यांनी डॉ. कराड यांना बोलते केले.
डॉ. कराड यांनी यावेळी त्यांचा राजकारणात प्रवास लोकमतचे एडिटर-इन -चीफ राजेंद्र दर्डा यांच्यामुळे झाल्याचे नमूद करत मंत्रीपद मिळण्याच्या आधी काय घडले हे उलगडले. ते म्हणाले, ''केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारावर सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती. मी औरंगाबादमध्येच होतो, अचानक पीएमओमधून फोन आला. तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत दिल्लीला येयचे आहे. का बोलवले असेल हे मी समजलो. मात्र, पुढचे काही तास तर मंत्रीपदी निवड झाल्यावर विश्वासच बसत नव्हता. मी तो नंबर खरेच पीएमओचा आहे का हे तपासून खात्री केली. त्यानंतर पुणे येथून दिल्ल्लीला गेलो आणि दुसऱ्यादिवशी संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. माझ्यासोबत इतर खासदारही होते. मोदीजी यांनी तुमची मंत्रीपदी निवड झाल्याचे सांगितले. त्यानंतर शपथविधी झाला' डॉ. भागवत कराड सांगत असलेला हा रोमांचक प्रवास औरंगाबादमधील प्रतिष्ठित नागरिक थक्क होऊन ऐकत होते. मंत्रिपदाचा शपथविधी झाल्यानंतर एका बैठकीत प्रधानमंत्री मोदी यांनी, मोठे आणि महत्वाचे मंत्रीपद दिले आहे, कष्ट करावे लागतील असे सांगितले. यावर मी डॉक्टर आहे, कष्ट करण्याची मला सवय आहे. तुम्हाला निराश करणार नाही, असा शब्द दिल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.
औरंगाबादचा करणार कायापालटरेल्वे, पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रातील औरंगाबादचे सामर्थ्य वाढविण्यासाठी दीर्घकालीन लाभ योजना लवकरच राबविण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री डॉ. कराड यांनी सांगितले. शहरात बँकेच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारे मसुरी सारखे केंद्रीय केंद्र सुरु करण्याचा संपल्प त्यांनी बोलून दाखवला. शहराची कनेक्टीव्हिटी वाढवणे, नवीन उद्योग शहरात आणणे, अजिंठा-वेरूळ-दौलताबाद या समृद्ध पर्यटन क्षेत्राचा येत्या काळात चेहरा बदलण्याची योजना तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.