औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत तब्बल १७८ कोटी रुपये खर्च करून शहर २४ तास अधिक सुरक्षित कसे राहील याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे. महापालिका हद्दीत तब्बल ७०० सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, आतापर्यंत ५० वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना तपासात मोलाची मदत झाली. या अत्याधुनिक यंत्रणेचे कमांड सेंटरच पोलीस आयुक्तालयात बसविण्यात आले. शहरातील संवेदनशील चौकात ५० पेक्षा अधिक नागरिकांची अनावश्यक गर्दी झाली तरी कंट्रोल रुममध्ये अलार्म वाजतो. एखाद्या गुन्ह्यात हवा असलेल्या आरोपीचे संकल्पचित्रही या यंत्रणेत टाकले तर हुबेहूब त्यासारखे दिसणारे किमान १० चेहरे शहराच्या कोणत्या भागात वावरत आहेत हे दिसून येते.
औरंगाबाद स्मार्ट सिटीचे प्रकल्प प्रमुख फैसल अली, खासगी कंपनीचे प्रकल्प प्रमुख आशिष शर्मा यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती डेमोसह दाखविली. महापालिका हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या परिसरात ६०० फिक्स, १०० चारही दिशेने फिरणारे हाय क्वालिटीचे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बीएसएनलच्या सहकार्याने शहरभर १५० किलोमीटरचे फायबर ऑप्टीक केबलचे जाळ विखुरण्यात आले. सर्व ७०० सीसीटीव्ही पूर्ण क्षमतेने सध्या सुरू आहेत. ४१८ ठिकाणांवर हे कॅमेरे कार्यरत आहेत. पोलीस आयुक्तालयात कमांड सेंटर उभारले आहे. या ठिकाणी संबधित कंपनीसह पोलीस अधिकारी, कर्मचारी शिफ्टनुसार संपूर्ण शहरावर वॉच ठेवत असतात. २४ बाय ७ पद्धतीने काम चालते. भविष्यात आमखास मैदानाजवळील स्मार्ट सिटीच्या कार्यालयातही एक स्वतंत्र कमांड सेंटर राहील. ज्या कंपनीला काम दिले आहे, त्या कंपनीने पुढील पाच वर्षे देखभाल दुरूस्ती करण्याची जबाबदारीही सोपविली आहे.
५० गुन्ह्यांमध्ये झाला फायदा
ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कॅमेरे बसविले आहेत, त्या ठाण्यातील कर्मचाऱ्यांना याचा गुन्ह्यांसाठी कसा वापर करायचे याचे प्रशिक्षणही दिले आहे. आतापर्यंत पोलीसांना ५० वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेने मोलाची भूमिका बजावली. मंगळसूत्र चोर, दरोडा, वाहन चोरी, अपघात अशा गुन्ह्यांमध्ये पोलिसांचे काम सोपे झाले.
प्रत्येक सामन्य नागरिक कॅमेऱ्यात
शहरभर सीसीटीव्हीचे जाळे विणले असल्याने सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या प्रत्येक नागरिक यामध्ये दिसून येतो. एखाद्या ठिकाणी कोणी संशयित व्यक्तीने काही सामान ठेवले तरी यातून सुटू शकत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपण सीसीटीव्हीच्या निगराणीत आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे.
संवेदनशील चौक, संशयित व्यक्ती
शहरातील काही संवेदनशील चौकात कॅमेऱ्याला ॲटो सिस्टीम दिली आहे. चौकात गरजेपेक्षा अधिक गर्दी वाढली तर कमांड सेंटरमध्ये अलार्म वाजतो. त्वरीत घटनास्थळी पोलीस दाखल होतात. एखाद्या संशयिताचे संकल्पचित्रही यंत्रणेत अपलोड केले तर त्याच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्ती कुठे-कुठे वावरत आहेत, हे यंत्रणा दाखविते. साधारण ३० दिवसांपर्यंत हा डेटा सांभाळून ठेवला जातो. काही अत्यंत महत्त्वाचा डेटा वर्षभर सांभाळण्याची क्षमता आहे. १५ पेटाबाईटस एवढी क्षमता या यंत्रणेची आहे.
प्रदूषणावर लक्ष
१७८ कोटीत सीसीटीव्ही शिवाय अवांतर अनेक कामे आहेत. महानुभव आश्रम, क्रांतीचौक येथे प्रदूषण मोजणारे अत्याधुनिक मशीन, शहरात ५० ठिकाणी डिजिटल डीस्प्ले यंत्रणा उभी केली आहे. भविष्यात महापालिकेच्या घंटागाडी, कचरा गाड्यांना जीपीएस, शहर बसचे ट्रॅकिंग आदी कामे केली जाणार आहेत.