सिल्लोड: सिल्लोडमध्ये सत्तार यांच्या पराभवासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी सिल्लोडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो. मतभेद असतील तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, अशी साद उद्धव ठाकरे यांनी घातली. सत्तार यांनी जमीन बळकावल्या. भूखंड पळवले. शासकीय मालमत्तांचा दुरुपयोग केल्याचे ठाकरे म्हणाले. या सर्व प्रकाराची चौकशी करून सत्तार यांना तुरुंगात टाकू, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. सिल्लोड येथील भाषणात सत्तार यांच्या विरोधात आक्रमक भाषण आणि त्यांच्या पराभवासाठी भाजपाला साद दिल्याने ठाकरे यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेनेची संस्कृती, विचार वेगळे आहेत. सभेत मुस्लिम भगिनी बसल्या आहेत. मी अब्दुल सत्तार यांना २०१९ मध्ये उमेदवारी दिली होती. ही माझी चूक झाली मी माफी मागतो. अशा गद्दाराना त्यांची जागा दाखवा व आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांना निवडून द्या. आता सर्वसामान्य माणसे एकवटत आहेत, त्यामुळं ही संधी सोडू नका. सिल्लोडमधील गुंडगिरी, दडपशाही रोखण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी साथ द्यावी. मतभेद असले तरी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, असं आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी सिल्लोडमध्ये भाजपमधील सत्तारांबद्दलच्या असंतोषाला हात घातला.
कर्नाटकमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार केला होता. त्याच पद्धतीने सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणारा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर होता, अशी टीका ठाकरे यांनी केली. मंत्रीपद देऊनही यांची भूकच शमत नाही असा हल्लाबोल करत ठाकरे म्हणाले, यांनी जमीन, भूखंड, शासकीय मालमत्ता बळकावली, याबाबत चौकशी करुन कारवाई केली जाईल. या लोकांनी सत्तेचा दुरुपयोग केला. सत्ता आल्यास चौकशी करुन यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. तसेच सोयाबीनला ७ हजार आणि लाडक्या बहिणीला महिन्याला ३ हजार रुपये देऊ असेही ठाकरे यांनी जाहीर केले.
यावेळी विरोधीपक्षनेता अंबादास दानवे, काँग्रेसचे खासदार कल्याण काळे,मिलिंद नार्वेकर,अनिल पटेल,द्वारकादास पाथ्रीकर, रंगनाथ काळे, उमेदवार सुरेश बनकर, सैयद अनिस, प्रा राहुल ताठे, दत्ता पांढरे, तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे, रघुनाथ चव्हाण, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर घायवाट, सुनील मिरकर, वृषाली मिरकर, मनोज अण्णा मोरेल्लू,अशोक तायडे, शेख फेरोज, कैसर आझाद, महेश शंकर पेल्ली सहित काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते.