उल्कानगरी येथून फिर्यादी महिला रिक्षात बसली असता, त्याआधीच या रिक्षात बसलेल्या आरोपीने या महिलेच्या खांद्यावर हात टाकून विनयभंग केला. फिर्यादी रिक्षातून उतरली, तिने आरोपीला शिवीगाळ केली व दुसऱ्या रिक्षाने आरोपीच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला सांगितले असता, तिनेही फिर्यादीला शिवीगाळ केली.
यासंदर्भात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक सरकारी वकील जनार्धन एस. जाधव यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात फिर्यादी व प्रत्यक्षदर्शीचे जबाब महत्त्वाचे ठरले.
सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला विनयभंगाच्या आरोपाखाली भा. द. वि. कलम ३५४ (अ) अन्वये ६ महिने सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड, तसेच शिवीगाळ केल्याबद्दल कलम ५०४ अन्वये ३ महिने सश्रम कारावास आणि २०० रुपये दंड ठोठावला. पैरवी म्हणून सुभाष भुरके यांनी काम पाहिले. फिर्यादी महिला अशिक्षित आहे.