बोरगाव अर्ज : महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथे दुसऱ्यांदा नादुरुस्त रोहित्र दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे दीड महिन्यापासून शेतकरी यासाठी दररोज पाठपुरावा करीत होते.
जळगाव मेटे येथील गावानजीक असलेली पांढरी डीपी म्हणून ओळखले जाणारे रोहित्र पावसाळ्यात नादुरुस्त झाले होते. यानंतर नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतर महावितरणने त्यावेळी दीड महिन्यानंतर नादुरुस्त रोहित्र दिले. त्यानंतर सदरील नादुरुस्त रोहित्र पुन्हा महिनाभरानंतर दुरुस्तीसाठी नेण्यात आला होता. त्यासाठीही नागरिकांनी पाठपुरावा करून लवकरात लवकर रोहित्र देण्याची मागणी केली होती. कारण पिकांना पाणी देण्याची समस्या कायम होती. यानंतर दोन दिवसांपूर्वी हा रोहित्र दुरुस्त करून तो बसविण्यात आला. मात्र, हा रोहित्र सुरू होत नसल्याने गावातील शेतकऱ्यांनी लाईनमनला बोलावून तपासणी केली असता, तो नादुरुस्त असल्याचे समजले. दुसऱ्यांदा नादुरुस्त रोहित्र दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून आम्ही अजून किती दिवस प्रतीक्षा करावी, आमचे रबीचे पीक धोक्यात आल्याची माहिती यावेळी शेतकरी शिवाजी मेटे यांनी व्यक्त केली.
चौकट
पाणी असूनही देता येईना
रोहित्र गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर रबीवर शेतकऱ्यांची भिस्त आहे. मात्र, विहिरींमध्ये पाणी असूनही पिकांना देता, येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कोट
सदरील विद्युत रोहित्र हा दुसऱ्यांना नादुरुस्त मिळाल्याने आम्ही हतबल झालो आहोत. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा दुरुस्तीसाठी नेलेल्या या रोहित्रासाठी आम्ही दीड महिन्यांपासून प्रतीक्षेत होतो. तरी पदरी निराशाच पडली. आम्ही अनेक वेळा स्वखर्चाने रोहित्राचे फ्यूज टाकले.
- दत्ताभाऊ मेटे, माजी सरपंच.
फोटो : दुसऱ्यांदाही नादुरुस्त दिलेले हेच ते विद्युत रोहित्र.