औरंगाबाद : नवीन शैक्षणिक वर्षापासून (जून २०१६) इयत्ता सहावीसाठी सुधारित अभ्यासक्रम असणार आहे. त्या दृष्टीने बालभारतीने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांसाठी सुधारित अभ्यासक्रमाची पुस्तके छापून तयार ठेवली असली तरी अद्यापही मराठवाडा आणि जळगाव अशा ६ जिल्हा परिषदा तसेच २ महापालिकांकडून पुस्तकांची मागणी आलेली नाही. सहावीसाठी बालभारतीकडे जवळपास २ लाख ३० हजार पुस्तकांचे संच सध्या उपलब्ध आहेत. काळानुरूप अभ्यासक्रम बदलला जातो. ‘प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम- २०१२ नुसार’ सुधारित अभ्यासक्रम बदलाची प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानुसार पहिलीपासून इयत्ता आठवीपर्यंत अभ्यासक्रमात बदल केला जात आहे.सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात पाचवीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. यंदा २०१६-१७ या नवीन शैक्षणिक वर्षापासून सहावीचा सुधारित अभ्यासक्रम राहील आणि सन २०१७-१८ मध्ये सातवीचा अभ्यासक्रमाचा बदल प्रस्तावित असल्याचे राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार यंदा सहावीच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार मंडळाने सर्व माध्यमांच्या पुस्तकांची छपाई करून ते बालभारतीच्या विभागीय कार्यालयांकडे वितरणासाठी पाठविले आहेत. बालभारतीकडे सर्वशिक्षा अभियानासाठी तसेच पुस्तक विक्रेत्यांसाठी सहावीच्या पुस्तकांचे संच उपलब्ध आहेत. बालभारतीला आता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून जिल्हा परिषदनिहाय पुस्तकांच्या मागणीची प्रतीक्षा आहे. बालभारतीच्या कार्यक्षेत्रात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांसह जळगाव जिल्हाही येतो. ६ जिल्हा परिषदा आणि औरंगाबाद व जळगाव या दोन महापालिका अशा एकूण ८ युनिटसाठी बालभारतीकडे पुस्तकांचा साठा उपलब्ध झाला आहे. अकरावीसाठी यंदा नवीन शैक्षणिक वर्षात केवळ मराठीचे पुस्तक नवीन असेल. बालभारतीकडे सहावीच्या सुधारित अभ्यासक्रमाबरोबरच इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सर्व शिक्षा अभियानांतर्गत वाटप केल्या जाणाऱ्या सर्व पुस्तकांचे संच सध्या उपलब्ध आहेत. ४मागणी आली की लगेच आम्ही पुरवठा करण्यास तयार आहोत, असे बालभारतीचे विभागीय भांडार व्यवस्थापक बी. एन. पुरी यांनी सांगितले. अकरावीसाठी नवीन मराठीचे पुस्तक यंदा २०१६-१७ या नवीन शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या अभ्यासक्रमातील मराठीचे ‘युवक भारती’ हे एकच पुस्तक सुधारित असेल. बालभारतीकडे सध्या हे पुस्तक उपलब्ध झालेले नसले तरी ते लवकरच वितरणासाठी येईल. या पुस्तकाची छपाई अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
जूनपासून सहावीसाठी सुधारित अभ्यासक्रम
By admin | Published: May 11, 2016 12:22 AM