छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी एमआयएम पक्षप्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी यांनी आज एका पत्रकार परिषदेत राज्यातील पाच उमेदवारांची घाेषणा केली. यामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह विद्यमान दोन आमदारांचाही समावेश आहे. महाविकास आघाडीसोबत युती करण्यासंदर्भाती चेंडू पुन्हा एकदा ओवेसी यांनी आघाडीच्या कोर्टात टोलावला.
विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीत आम्हाला घ्या, अशी खुली ऑफर महाविकास आघाडीला दिली होती. ८ सप्टेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जलील यांनी मागील आठवड्यातच केली होती. सोमवारी पक्षाचे प्रमुख असदोद्दीन ओवेसी शहरात दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत हज हाऊस येथे वक्फ बिलाच्या विरोधात परिषद घेण्यात आली.
यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, आघाडीने चर्चा केली. नंतर निर्णय कळविला नाही. त्यामुळे आज आम्ही पाच उमेदवारांची घोषणा करीत आहोत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथून प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, मालेगाव येथून विद्यमान आ. मुफ्ती मोहमद इस्माईल, धुळे येथील आ. फारूक शहा, सोलापुर येथून फारूक शाब्दी, मुंबई येथून रईस लष्करीया यांचा समावेश आहे. राज्यात किती जागा लढविणार या प्रश्नाचे उत्तर त्यांनी टाळाले. ओवेसी यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून लढणार हे सुद्धा स्पष्ट केले नाही.