राज्यातील लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन औरंगाबादमध्ये शिवसेना आणि एमआयएम पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहेत. राज्य सरकारनं लॉकडाऊन संपवला नाही तर १ जूनपासून औरंगाबादमध्ये सर्व दुकानं उघडू आणि लॉकडाऊनचा निषेध करू, अशी ठाम भूमिका एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली आहे. यावर आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही जलील यांना थेट आव्हान दिलं आहे.
"इम्तियाज जलील हे दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचे काम करत आहेत. ते जर दुकानं उघडायला आले तर शिवसैनिक उत्तर देतील. लॉकडाऊन उघडलं तर तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनानं इम्तियाज जलील यांच्यावर तातडीनं कारवाई करावी", अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. दरम्यान, इम्तिजाय जलील यांनी लॉकडाऊन मागे घेण्यात आला नाही तर १ जूनपासून औरंगाबादमध्ये लॉकडाऊनचं पालन केलं जाणार नाही. शहरातील सर्व दुकानं आम्ही उघडू, असं खुलं आव्हान जलील यांनी दिलं आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन औरंगाबादमध्ये राजकीय वाद उफाळून पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.