- नजीर शेख
दलित- मुस्लिम मतांची एकजूट आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीमुळे राज्यात सर्वाधिक चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेला धक्का दिला. राज्यातील वंचित आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविण्याची किमया इम्तियाज जलील यांनी केली.
औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे आ. सुभाष झांबड आणि अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांच्यात चौरंगी लढत झाली. गेल्या वीस वर्षांपासून चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा हा बालेकिल्ला राखला होता. खैरे यांना पराभूत करू शकेल, एवढी ताकद असलेला उमेदवार विरोधकांना आतापर्यंत मिळालेला नव्हता. इम्तियाज जलील यांनी २०१४ मध्ये औरंगाबाद मध्य मतदारसंघात एमआयएमकडून अनपेक्षितपणे विजय मिळवून शिवसेना- भाजपला जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर अवघ्या साडेचार वर्षांत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा धक्का दिला. अर्थात, या मतदारसंघात यावेळी कधी नव्हे एवढी दलित आणि मुस्लिम मतांची एकजूट झाल्याचे कारणही खैरेंच्या पराभवाला कारणीभूत ठरले. त्याच्या जोडीलाच अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांची उमेदवारीही खैरे यांना घातक ठरली.
चार वेळा विजयी झालेल्या खैरे यांच्याविरुद्ध यावेळी वातावरण असल्याची जोरदार चर्चा मतदानाआधी होती. मतदान झाल्यानंतरही खैरे आणि जलील यांच्यातच लढत होईल, असे चित्र निर्माण झाले होते. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी तर मतदान संपताच फटाके फोडले होते. तरीही खैरे यांचाच विजय होईल, अशी सार्वत्रिक चर्चा होती. मात्र, ही चर्चा निकालाअंती फोल ठरली. राज्यात वंचित आघाडीने यंदाच्या निवडणुकीत दलित- मुस्लिम आणि बहुजन यांच्या आघाडीचा प्रयोग स्वबळावर राबविण्याचे ठरविले. या प्रयोगाची औरंगाबादेतील चाचणी यशस्वी ठरली.
सेनेने आणि विशेषकरून खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिलेले कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीला पहिल्या टप्प्यात फारसे गांभीर्याने घेतले नाही. दीड वर्षापासून जाधव हे सातत्याने निवडणूक लढविण्याची आणि खैरेंचा पराभव करण्याची भाषा बोलत होते. आपले गाऱ्हाणे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावरही घातले होते; परंतु शिवसेनेने खैरे यांनाच पाठबळ दिले. इम्तियाज जलील यांच्या रूपाने का होईना खैरे यांचा पराभव झाल्याने जाधव यांना मोठा आनंद झाल्याचे निकालानंतर त्यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट झाले.
खरे तर काँग्रेस आणि हर्षवर्धन जाधव यांना थोपविण्यासाठी शिवसेनेकडून ‘आमची लढत एमआयएमशी आहे’ असे मुद्दामहून सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात एमआयएमने खैरे यांना अखेरच्या क्षणापर्यंत झुंजविल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला. मतदानानंतर भाजपच्या बड्या नेत्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी आपले काम न केल्याचा ठपका ठेवत तशी तक्रारही खैरे यांनी पक्षप्रमुखांकडे, त्याचप्रमाणे भाजपकडे केली होती. खैरे यांची शंका प्रत्यक्षात खरी होती की काय, असे आता निकालानंतर वाटू लागले आहे. या मतदारसंघात जात आणि धर्माची सरळ विभागणी झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. औरंगाबाद शहरातील कचरा, पाणी समस्या आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची केंद्र आणि राज्य सरकारविरुद्धची नाराजी याबद्दल निवडणुकीआधी चर्चा झाली. मात्र, या मुद्यांपेक्षा जातीपातीचे गणित आणि या गणिताची जुळवणूक यावर ही निवडणूक झाल्याचे स्पष्ट होत आहे.
स्कोअर बोर्डशेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत जलील यांनी केवळ ४,४९२ मतांनी खैरे यांच्यावर विजय मिळविला. हर्षवर्धन जाधव यांनी २ लाख ८३ हजार ७९८ मते घेत खैरेंच्या बालेकिल्याला भगदाड पाडले. त्या भगदाडातून जलील यांनी ३ लाख ८९ हजार ४२ मते घेत विजयी प्रवेश केला, तर खैरे यांना ३ लाख ८४ हजार ५५० मतांवर समाधान मानावे लागले. या तीन उमेदवारांच्या गदारोळात काँग्रेस पक्ष मात्र पार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. आ. सुभाष झांबड यांना केवळ ९१ हजार ७८९ इतकीच मते पडली.
चंद्रकांत खैरेंच्या पराभवाची कारणे- हर्षवर्धन जाधव यांना रोखण्यात अपयश.- वीस वर्षांच्या खासदारकीनंतर विरोधाचे वातावरण. - स्वपक्षीयांची मनापासून साथ मिळाली नाही.- वंचित आघाडीचा नियोजनबद्ध भूमिगत प्रचार.