छत्रपती संभाजीनगर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१४ च्या निवडणुकांपासून ईव्हीएममध्ये ‘नोटा’चा पर्याय देण्यात आला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून २३ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये १४ विविध पक्षांचे तर ०९ अपक्ष उमेदवार होते. त्यानंतरही ४ हजार ९२९ मतदारांनी नोटाचा वापर केला. विजयी उमेदवार इम्तियाज जलील यांचे मताधिक्य त्यापेक्षा कमी म्हणजे ४ हजार ४९२ एवढे होते.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख राजकीय पक्षांचे तीन उमेदवार आणि एका अपक्ष उमेदवाराला वगळले तर उर्वरित २० उमेदवारांनी सर्वाधिक ४४ हजार ९३ मते मिळविली होती. यातील तीन उमेदवारांनी तर प्रत्येकी चार ते पाच हजार मतदान घेतले होते. त्यांचे मतदान पाहून विविध राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांना एवढी मते पडतील असे कोणाला वाटलेही नव्हते. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही सर्वाधिक २७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात उमेदवारांची सर्वोच्च संख्या ठरली होती. मागील दोन निवडणुकांपासून लोकसभेसाठी उमेदवार सर्वाधिक येत आहेत. त्यापूर्वी निवडणूक रिंगणात ६ ते ९ उमेदवार राहत होते.
मागील दोन निवडणुकांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अपक्ष तथा अन्य छोट्या पक्षांच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्या म्हणून फारसा आग्रहसुद्धा केला नाही. जेव्हा निवडणूक लढण्याची वेळ आली तेव्हा काही उमेदवार प्रचारात अजिबात दिसत नव्हते. दररोज निवडणूक विभागाला खर्च देण्यासाठी जाणे-येणे महागात पडत होते.