छत्रपती संभाजीनगर: 'मी इलेक्शन मॅनेजमेंट करतो, मला तुमचे मला काम द्या. अडीज कोटी रुपयांत, ईव्हीएम देखील हॅक करतो.' असा फोन विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना एका तरूणाने केला. यासाठी त्याने दानवे यांच्याकडे अडीज कोटी रुपयांची मागणी देखील केली. मात्र, शंका आल्याने दानवे यांनी लागलीच पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी सापळा रचून त्या तरुणाला आज दुपारी चार वाजता शहरातील मुख्य बसस्थानकासमोरील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील मारुती ढाकणे हा तरुण लष्करी जवान आहे, सध्या तो सुटीवर आला आहे. मागील पाच सहा महिन्यांपासून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना ढाकणे याने सातत्याने फोन करून मी इलेक्शन मॅनेजमेंट करतो, मला काम द्या अशी गळ घातली. दानवे यांनी नेमके कोणते काम करतो असे विचारले असता, 'अडीज कोटी रुपये द्या, मी ईव्हीएम मशीन हॅक करून देतो' असे ढाकणे याने सांगितले. शंका आल्याने दानवे यांनी पोलिसांत याची माहिती दिली. त्यानंतर हा नेमका प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्याला पैसे घेण्यास शहरात बोलावले. मुख्य बसस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये येताच पोलिसांनी सापळा रचून ढाकणे यास एक लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले. हा तरुण लष्करात जवान असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
लष्करात जवान असून डोक्यावर कर्जहा तरुण लष्करात जवान असून जम्मू काश्मीर येथे कार्यरत आहे. भामटेगिरी करत त्याने ईव्हीएम हॅक करतो अशी बतावणी करत अडीज कोटी रुपयांची मागणी केली. वास्तविक त्याला संगणकाचे काही ज्ञान नाही. डोक्यावर कर्ज झाल्याने त्याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आल्याची माहिती पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली आहे.
मुद्दाम तक्रार करून खरा प्रकार उघडकीस आणलाईव्हीएम मशीन हॅक करून त्याला चिप बसवून मतांची आकडेवारी जशी पाहिजे तसे करतो, तरुणाकडून असा फोन आल्याने शंका आली. या सगळ्या गोष्टी खोट्या असल्याची खात्री असल्याने याची माहिती पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांना माहिती दिली. लेखी तक्रार दिली. त्याला पोलिसांनी ट्रॅप करून पकडले आहे. मुद्दाम मी तक्रार दिली. त्या व्यक्तीशी माझी ओळख नाही, दोस्ती नाही आणि दुश्मनीही नाही. असा प्रकार अन्य ठिकाणी होत असेल तर जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे. अशा लोकांमुळे ईव्हीएम मशीनबद्दल जनतेच्या मनात संम्रभ वाढतो.- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता