औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्त राजकीय पक्षांनी जागोजागी बॅनरबाजी केली होती. याला विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता. आश्वासनानंतरही बॅनर हटले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी संघटनानी आज दुपारी अशा बॅनरसमोर आंदोलन केले. याची दखल घेत अखेर विद्यापीठ प्रशासनाने हे सर्व बॅनर हटवले आहेत.
या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार यांची नावे डावलण्यात आल्याने वाद उफाळला. त्यावरून विद्यापीठ प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आली. तसेच विद्यार्थी संघटनांना हा कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. दरम्यान, विद्यापीठ परिसरात राजकीय बॅनरबाजी सुरु आहे. या प्रकारावर विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला. आज दुपारी कार्यक्रमाच्या काही तास आधी अमोल दांडगे, लोकेश कांबळे, अमोल खरात, सत्यजित मस्के, दीक्षा पवार यांनी बॅनरसमोर आंदोलन केले. बॅनर काढली नाहीत तर आम्ही काढू असा इशारा संघटनांनी दिला.
त्यानंतर विद्यार्थी संघटनांसोबत कुलगुरू प्रमोद येवले यांनी चर्चा केली. अखेर विद्यापीठ प्रशासनाने परिसरातील सर्व बॅनर काढली. या सोहळ्यानिमित्त विद्यापीठ परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे.