औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे दोन महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा पडून होता. १४ हजार लसींचा साठा ३१ डिसेंबर रोजी कालबाह्य झाला. त्यामुळे सोमवारपासून लसीकरण मोहीम बंद पडली. दोन वर्षांत १८ लाख ७६ हजार १६८ जणांचे लसीकरण मनपाकडून करण्यात आले. आता लसीकरणासाठी पुन्हा ७५ हजार लसींची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, कार्बोव्हॅक्स लसींचा समावेश आहे.
शहरात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती. मनपाच्या सर्व आरोग्य केंद्रात ही सुविधा सुरू होती. राज्य सरकारकडून वेळाेवेळी महापालिकेला लसींचा साठा देण्यात येत होता. १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट १० लाख ५५ हजार ६५४ ठेवण्यात आले होते. त्यापैकी ९ लाख १३ हजार ८२३ जणांनी पहिला डोस घेतला, तर ७ लाख २१ हजार ६१४ जणांनी दुसरा डोस घेतला. बूस्टर डोस घेण्याचे प्रमाण मात्र त्या तुलनेत अत्यंत कमी आहे. १ लाख ३ हजार ४१६ जणांनीच तिसरा डोस घेतला. त्यामुळे पहिला डोस घेणारे १ लाख ४१ हजार ८३१ आणि दुसरा डोस घेणारे ३ लाख ३४ हजार ४० शिल्लक आहेत. जानेवारीत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मनपाने शासनाकडे कोविशिल्डच्या ५० हजार, कोव्हॅक्सिनच्या १५ हजार आणि कार्बोव्हॅक्सच्या १० हजार लसी पहिल्या टप्प्यात मागवल्या आहेत.
३५ लाखांच्या लस वायामुदत संपल्यामुळे कोरोनाच्या १४ हजार लसींचा साठा कालबाह्य ठरला. पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोविशिल्डची एक लस ७०० रुपये, तर काेव्हॅक्सिनची १५०० रुपयांपर्यंत खासगी रुग्णालयात देण्यात आली होती. २४४ रुपयांना शासनाने ती कंपनीकडून खरेदी केली. त्यानुसार किमान ३५ लाख रुपयांच्या लसी लोकांनी न घेतल्यामुळे वाया गेल्या.