औरंगाबाद: शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ना ताकद आहे ना उमेदवार असे असताना भाजपच्या तीन वर्षापासून येथे उगाच दंडबैठका सुरू असल्याची टिका विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
भाजपने औरंगाबाद लोकसभा मतदार संघावर नजर ठेवून काम सुरवात केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची जाहिर सभा औरंगाबादेत आयोजित केली. याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आ.दानवे म्हणाले की, औरंगाबाद जिल्हा ३० वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथे भाजपची ताकद नाही, एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या उमेदवारांच्या तोडीस तोड असा उमेदवारही नाही, असे असताना भाजपकडून उगाच लोकसभा मतदार संघावर डोळा ठेवून दंड बैठका सुरू केल्या आहेत. त्यांच्या या दंड बैठकांना काहीच अर्थ नसल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपकडून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याकडे तुम्ही कसे पहाता, याप्रश्नाचे उत्तर देताना दानवे यांनी डॉ. कराड हे चांगले उमेदवार आहे. त्यांच्याविरोधात लढताना मजा येईल असे नमूद केले.