छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद पूर्व मतदारसंघात भाजप आणि एमआयएममध्ये कांटे की टक्कर असल्यासारखे चित्र निर्माण होत आहे. मतदारसंघ परिसिमनानंतर ही चौथी निवडणूक होत असून, २०१४ पासून एमआयएम या मतदारसंघात भाग्य आजमावत आहे. भाजपने दोन वेळा एमआयएमला पराभवाची धूळ चारली असून, यावेळी तिसऱ्यांदा भाजप आणि एमआयएम आमने-सामने आहे.
भाजप महायुतीकडून गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, तर एमआयएमकडून इम्तियाज जलील यांच्यात थेट लढत होणार असे चित्र असून, सोबत काँग्रेसचे लहूजी शेवाळे, सपाचे उमेदवार डॉ. गफ्फार कादरी, वंचितचे अफसर खान, बसपच्या शीतल बनसोडे मिळून मतदारसंघात सर्वाधिक २९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १६ मुस्लीम उमेदवारांचा समावेश आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या या मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी असली, तरी खरी लढत महायुतीचे उमेदवार अतुल सावे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यातच होत असल्याचे चित्र सध्या आहे.
अतुल सावे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून तिसऱ्यांदा मैदानात आहेत. २०१४, २०१९ ला या मतदारसंघातून विजय मिळविल्यानंतर यावेळी ते हॅट्ट्रिक साधतील की नाही, याकडे लक्ष आहे. जलील पहिल्यांदाच या मतदारसंघातून भाग्य आजमावत आहेत. मुस्लीम मतविभाजन किती प्रमाणात होते, त्यावर महायुतीची भिस्त आहे, तर महाविकास आघाडीला मुस्लीम, दलितांसह हिंदू मतांचा आधार हवा आहे. एमआयएमलाही मुस्लीम मतांवरच विजयाची आशा आहे.
लोकसभेत कुणाला किती मते...लोकसभेला पूर्व मतदारसंघातून नोटासह २ लाख ६ हजार ६३३ मतदान झाले होते. यात एमआयएमला सर्वाधिक ८९ हजार ६३३ मते मिळाली होती. उद्धवसेनेला (महाविकास आघाडी) ३८ हजार ३५०, तर शिंदेसेनेला ६३ हजार २२८ मते मिळाली होती. वंचितला ८ हजार १४५ मते होती. पूर्व मतदारसंघात ३ लाख ५२ हजार ३१३ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ लाख ८२ हजार ५२७, तर महिला मतदार १ लाख ६९ हजार ७७२ आहेत.
अतुल सावे यांच्या जमेच्या बाजू...१. १० वर्षांत मतदारसंघात रस्ते विकासकामांसाठी निधी खेचला.२. पाणीपुरवठा योजनेच्या पाठपुराव्यामुळे जलसम्राट उपाधी.३. कोविड काळात आरोग्य सेवा-सुविधांमुळे सामान्यांना आधार.४. मतदारसंघात जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क.५. मितभाषी व्यक्तिमत्त्व असल्यामुळे अजातशत्रू.
उणे बाजू...१. मराठा मतदार साथ देणार की नाही, याची चिंता.२. गुंठेवारी वसाहतींतील रस्ते अतिक्रमणमुक्त करणे.३. मतदारसंघात स्वस्त घरकूल योजना आली नाही.४. मतदारसंघातील नवीन वसाहतींमध्ये संपर्क कमी.५. हिंदू बहुल भागातील मतदानाच्या टक्केवारीवर भिस्त.
---------------------------इम्तियाज जलील यांच्या जमेच्या बाजू१. मुस्लीम मतदारांच्या एकत्रित मतदानावर मदार.२. उच्चशिक्षित असल्यामुळे सर्वांमध्ये परिचित.३. विधानसभा, लोकसभेच्या कामाचा अनुभव.४. मुस्लिमांसह सर्व समाज घटकांसोबत बैठक.५. वक्तृत्व कौशल्य परिणामकारक असल्याने फायदा.
इम्तियाज जलील यांची उणे बाजू१. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाला वारंवार गैरहजेरी लावण्याचा आरोप.२. शेवटच्या क्षणापर्यंत व्होटबँक टिकवून ठेवण्याचे आव्हान.३. विकासकामे सांगण्यासाठी मतदारसंघात परिश्रम करावे लागणार.४. १० वर्षांत एकही प्रकल्प, योजना नावावर नसल्याचा आरोप.५. मतांचे होणारे ध्रुवीकरण टाळण्याचे मोठे आव्हान.