औरंगाबाद : थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी ठोक विक्रेत्याकडून घेतलेल्या गांजापैकी शिल्लक २२ किलो ७०० ग्रॅम गांजा परत करण्यासाठी जात असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून पकडला. एनडीपीएसच्या पथकाने हैदराबादहून रेल्वेने आलेला २० किलो ७०० ग्रॅम गांजा रेल्वेस्टेशन परिसरात सापळा रचून पकडला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको व वेदांतनगर पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविला असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांनी दिली.
उमेर खान इक्बाल खान (२८), अकबर खान इक्बाल खान (२६, दोघे रा. यासीननगर, हर्सूल परिसर) या सख्ख्या भावांसह गांजाचा ठोक विक्रेता सय्यद युनूस सय्यद मलिक (रा. पुष्पा गार्डन, चिकलठाणा) अशी आरोपींची नावे आहेत. रेल्वे स्टेशनवर पकडलेल्या आरोपींमध्ये रुपा रणजित इंद्रेकर (४५) आणि नयन रणजित इंद्रेकर (२२, रा. कसाबखेडा फाटा) या मायलेकराचा समावेश आहे. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांना चिकलठाण्यातून केंब्रिज चौकाकडे स्कोडा कारमधून (एमएच २० बीसी ८५९८) गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार केंब्रिज चौकात सोमवारी दुपारी सापळा लावला. कार थांबवून चौकशी केल्यानंतर उमेर व अकबर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी हा गांजा सय्यद युनूसकडून आणल्याची कबुली दिली. कारची झडती घेतल्यानंतर त्यात ४ लाख ५४ हजार रुपये किंमतीचा २२ किलो ७०० ग्रॅम एवढा गांजा आढळला. त्याशिवाय १० लाखांची कार, १ लाखांचे तीन मोबाईल असा एकूण १५ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सपोनि मनोज शिंदे, काशीनाथ महांडुळे, हवालदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, दत्तात्रय गढेकर, भगवान शिलोटे, राजेंद्र चौधरी, विशाल पाटील, विलास मुठे, नितीन देशमुख, ज्ञानेश्वर पवार आणि तातेराव शिनगारे यांच्या पथकाने केली. त्यांना विभागीय न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे विश्लेषक डॉ. गोविंद भोसले, रवि जैस्वाल यांनी मदत केली. हैदराबादहून आणतात गांजा
एनडीपीएस पथकास हैदराबादहून रेल्वेने गांजा येणार असल्याची माहिती सोमवारी सायंकाळी मिळाली. त्यानुसार एनडीपीएस पथकाचे सपोनि. सुधीर वाघ, अंमलदार नितीन देशमुख, मंगेश हरणे, धर्मराज गायकवाड, राजाराम वाघ, सुनील पवार, दत्ता दुभळकर व प्राजक्ता वाघमारे यांच्या पथकाने सापळा लावला. यात रूपा इंद्रेकर व तिचा मुलगा नयन या दोघांना पकडले. त्यांच्याकडून ४ लाख १४ हजार रुपये किमतीचा २० किलो ७०० ग्रॅम गांजा पकडला. एम. सिडकोत दाखल गुन्ह्याचा तपास सपोनि शिवाजी चौरे, तर वेदांतनगरमधील तपास सपोनि. अनिल कंकाळ करीत आहेत.