- संतोष हिरेमठऔरंगाबाद :औरंगाबाद रेल्वेस्टेशन सध्या उंदीर मामांनी अक्षरश: पोखरून काढले आहे. स्टेशनच्या नव्या इमारतीपासून तर मालधक्क्यापर्यंत उंदरांनी जागोजागी बिळे केली आहेत. रेल्वे रुळांपासून थेट कार्यालयांमध्ये उंदरांचा मुक्त संचार आहे. हेच उंदीर रेल्वेगाड्यांमध्ये घुसून प्रवाशांनाही त्रस्त करून सोडत आहेत. या सगळ्यानंतरही गेल्या ४ वर्षांपासून त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारीच रेल्वे प्रशासनाने कोणाकडे दिलेली नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचारी आणि स्टेशनवरील व्यावसायिकांनाच उंदरांचा बंदोबस्त करावा लागत आहे.
रेल्वेस्टेशनवर रेल्वेच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना रुळावर मोठमोठ्या मुषकराजांचे दर्शन होत आहे. रुळावर त्यांना खाद्य मिळते. त्यामुळे त्यांचा तेथे वावर वाढला आहे, मात्र रूळ हेच फक्त त्यांचे 'कार्यक्षेत्र' नाही तर स्टेशन इमारतीतील विविध कक्षांमध्ये, कॅन्टीनमध्येही उंदीर मामा नजरेस पडतात. खालच्या बाजूने उंदरांनी रेल्वेस्टेशनचा परिसर अक्षरश: पोखरला आहे. लोहमार्ग पोलिस ठाणे, आरपीएफ ठाणे, तिकीट काउंटर, कॅन्टीन, प्रवासी प्रतीक्षालय या सर्वच ठिकाणी उंदरांचा मुक्त वावर आहे. रुळापासून तर मालधक्का परिसरापर्यंत उंदरांनी बिळे केली आहेत. या चोरमार्गाने त्यांचा स्टेशन ते मालधक्का असा संचार सुरू असतो.
रेल्वे प्रशासनाने चार वर्षांपूर्वी उंदीर मारण्याचे काम दिले होते, परंतु आता या कामाची जबाबदारीच कोणाकडे नसल्याची माहिती समोर आली आहे. स्टेशनवरील उंदरांची संख्या आणि सध्या करण्यात येत असलेली उपाययोजना यांचा कुठे मेळ बसत नाही. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना हाती घ्यावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
उंदरांनी केलेले प्रताप- औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील अधिकाऱ्यांच्या कक्षातील संगणकाच्या वायर्स कुरतडल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली आहे.- डिसेंबर २०१९ मध्ये नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाच्या बॅगचा उंदरांनी अक्षरश: चिंध्या केल्या होत्या. मिठाईच्या बाॅक्सवरही उंदरांनी ताव मारला होता.- २०१६ मध्ये मराठी चित्रपत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेल्वेच्या वातानुकूलित बोगीतून प्रवास करीत होत्या. तेव्हा उंदरांनी त्यांची पर्स कुरतडून टाकली होती.- ऑगस्ट २०१५ मध्ये रेल्वेस्टेशनवरील रेस्टॉरंटमध्ये सांबरमध्ये उंदीर आढळून आला होता.