औरंगाबाद: अग्निपथ योजनेत भरतीसाठी आलेला एक २१ वर्षीय तरुण मैदानी चाचणी सुरु असताना बुधवारी रात्री चक्कर येऊन कोसळला. त्यानंतर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचारादरम्यान त्याचा आज दुपारी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. करण नामदेव पवार( २१, रा. विठ्ठलवाडी ता. कन्नड ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्य दलाच्या अग्निविर भरती सुरू आहे. यासाठी कन्नड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील २१ वर्षीय तरुण करण नामदेव पवार देखील भरतीसाठी आला होता. बुधवारी रात्री १२ वाजता शेवटचा ग्राऊंड काढत असतांना करण चक्कर येऊन पडला. त्यामुळे त्याला लागलीच शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरु असताना आज दुपारी त्याचा मृत्यू झाला.
पार्किंग, निवारा, नाश्ता, पाणी, स्वच्छतागृहाचा अभाव विद्युत कॉलनीतून भरतीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. पार्किंगची व्यवस्था नसल्याने भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मैदानी चाचणी पास केलेल्या विद्यार्थ्यांना दिवसभर नाश्ता, जेवणाची व्यवस्था पुरेशी नव्हती. अन्नदान व विद्यार्थ्यांना मदत करू इच्छिणाऱ्यांना आतमध्ये जाण्यास परवानगी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचण्यात अडचणी येत होत्या. मैदानी चाचणी पास केलेल्या शेवटच्या उमेदवारांना बाहेर पडण्यास बुधवारी १० वाजेपेक्षा अधिक वेळ लागला. दहा वाजता बाहेर पडलेल्या उमेदवारांना परत गुरुवारी सकाळी पाच वाजता वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात आल्याने त्या विद्यार्थ्यांना मुक्कामी राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यांच्या राहण्याची काही संस्थांनी मोफत व्यवस्था केली. मात्र, अनेकांना रस्त्यालगत सहारा घ्यावा लागला. आतमध्ये स्वच्छतागृहे कमी व अस्वच्छ आहेत. बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांना उभे राहण्यासाठी व पाऊस आल्यास आडोशाला जागा नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे पार्किंग, ग्राउंडमध्ये प्रवेशित शिवाय असलेल्यांना थांबण्याची व्यवस्था, जेवण, नाश्ता, थांबण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी भरतीसाठी आलेल्या महेश बकाल यांनी केली.
मध्यरात्री १२ वाजता होते प्रक्रिया सुरुअग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यदलाच्या भरती प्रक्रियेला १२ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर विद्यापीठाच्या मैदानावर सुरुवात झाली. २३ वयोगटापर्यंतच्या सहा पदांसाठी सुरू असलेल्या भरतीसाठी ८० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिस्तबद्धरीत्या मेलद्वारे १,२०० ते १,५०० विद्यार्थ्यांना एका दिवशी बोलावण्यात आले आहे. अग्निवीर जनरल ड्युटी (जीडी, टेक्निकल, सोल्जर टेक्निकल, लिपिक, ट्रेड्समन अशा पदांसाठी ही प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी मध्यरात्री १२ वाजता जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते. परीक्षा दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत सुरू होती. तोच बुधवारी रात्री बोलावलेले उमेदवार विद्यापीठ परिसरात दाखल व्हायला सुरुवात झाली.