वाळूज महानगर : बजाजनगरात दहा दिवसांपासून नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. त्यातच पाण्याच्या वादातून पती, पत्नी व मुलांना मारहाण झाल्याची घटना बजाजनगरात रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी ताराचंद यमाजी खोसे (४५, रा.अयोध्यानगर, बजाजनगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
बजाजनगरात, रविवारी खोसे यांच्या पत्नीचा घरालगतच असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरातील बोअरमधून पाणी घेण्यावरून वाद झाला. त्यातूनच वाळूज येथील भास्कर आरगडे व त्याच्यासह इतर चौघांनी खोसे यांच्या सोसायटीत जाऊन, घराबाहेर बोलावून शिवीगाळ करून मारहाण केली. मध्यस्थी करणाऱ्या खोसे यांच्या मुलांना मारहाण तर पत्नीला धक्काबुक्की केल्याचा प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याप्रकरणी खोसे यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून, आरोपी भास्कर अरगडे व इतरांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान, ठाण्यात भेट देण्यासाठी आलेल्या पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी संबंधित आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
दोन वर्षांपूर्वी चाकूहल्ल्याची घटनावाळूज महानगरात २०२२ मध्ये नळाचे पाणी भरण्यावरून दोन कुटुंबीयांमध्ये शाब्दिक चकमक उडून त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले होते. हा वाद विकोपाला जाऊन चौघांवर चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सात जणांविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. एमआयडीसी प्रशासनाने वेळीच पाण्याचे नियोजन करावे अन्यथा येत्या काळात यापेक्षा अधिक भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत येथील रहिवाशांतून व्यक्त होत आहे.
नियोजनाच्या अभावामुळे, नागरिकांची तारांबळबजाजनगरात २४ तास पाणी उपलब्ध असते, त्यामुळे बहुतांश नागरिकांच्या घरी अधिकचा पाणी साठा करण्याची व्यवस्था नाही. त्यातच घरमालकांना भाडेकरूंसाठी सुद्धा पाण्याची तजवीज करावी लागत असल्याने, बहुतांश सोसायटी, वसाहतीमध्ये शेजारी-शेजाऱ्यांमध्ये पाण्यावरून वाद होताना दिसत आहेत. प्रशासनाने वेळीच यावर तोडगा न काढल्यास भविष्यात पाण्याच्या वादातून मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.