छत्रपती संभाजीनगर : अजाणत्या वयात झालेली चूक, अत्याचार, अनैतिक संबंध किंवा अठरा विश्वे दारिद्र्य, अशा अनेक कारणांतून जन्मदात्यांना मूल नकाेसे असते. सहा दिवसांमध्ये शहरात अशा पाच बालकांचा जन्मदात्यांनी त्याग केला. त्यात तिघांना अक्षरश: उघड्यावर फेकले गेले. वेळीच लक्षात आल्याने मोकाट जनावरांनी लचके तोडण्याआधीच त्यांचा जीव वाचला. गेल्या १० महिन्यांत अशी १३ नवजात बालके रस्त्यावर फेकून दिली गेली, तर ३१ पालकांनी समितीकडे सोपवून जन्मत:च पोटच्या बाळासोबत संबंध तोडल्याची हृदयद्रावक माहिती पाहणीत दिसली.
कर्णपुरा यात्रेत शनिवारी पहाटे भाविकांची मोठी गर्दी होती. एकीकडे मोठा भक्तांचा जयघोष, तर दुसरीकडे हॉटेलमध्ये गाण्यांची, ग्राहकांची रेलचेल होती. याच कर्कश आवाजात बऱ्याच वेळापासून कोपऱ्यातून बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. रडण्याचा आवाज वाढत गेल्याने काही सुजाण नागरिकांनी ते गांभीर्याने घेत शोध घेतला. कुत्रे पोहोचण्याआधीच स्थानिकांनी त्याला कुशीत घेतले. पोलिसांनी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. आशा शेरखाने कटके यांच्या सूचनेवरून त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले.
आठवड्यातली तिसरी घटना१७ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता अंदाजे अडीच महिन्यांची मुलगी अज्ञातांनी ज्योतीनगरच्या साकार संस्थेच्या पाळण्यात सोडून दिली. त्यापूर्वी छावणीत एक दिवसाचे बाळ रस्त्याच्या कडेल फेकलेले आढळले, तर शनिवारी तिसरे बाळ कर्णपुऱ्यात आढळले. याच आठ दिवसांत दोन महिलांनी समितीकडे मुलींना सोडून दिले. २०२२-२३ मध्ये एकूण ४५ मुलांचा जन्मदात्यांनी त्याग केला.
सुरक्षितरीत्या परित्यागअत्याचारातून, अजाणत्या वयातले संबंध, गरिबी वा अन्य कारणांतून झालेले मूल नकाेसे झाल्यानंतर पालक समितीकडे बाळ सोपवत असतील तर त्याला परित्यागित (सरेंडर) म्हणतात. अशी १० महिन्यांत १६ मुले, तर १५ मुली समितीकडे प्राप्त झाल्या. त्याशिवाय गत आठवड्यात २ थेट समिती, तर १ मुलगी साकारमध्ये प्राप्त झाली. याच कालावधीत कठोरपणे ६ मुले व ६ मुली रस्त्यावर फेकून दिली.
फेकण्याऐवजी समितीकडे द्या-शासनाच्या २०१५ च्या बालन्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यांतर्गत बालकल्याण समिती अशा परित्यागित मुलांचा सांभाळ करू शकते. मूल नको असलेले पालक त्याला फेकण्याऐवजी समितीकडे सोपवू शकतात.-त्याची रीतसर शासनदरबारी ऑनलाइन नोंदणी होऊन नवीन नाव मिळते.-सुरक्षित राहून दत्तक गेल्यास हक्काचे कुटुंबही मिळते.-१८ वर्षांपर्यंत त्याचा सांभाळ होतो. त्यानंतरही अनुरक्षणग्रह प्रक्रियेंतर्गत पुढील शिक्षणाचीही सोय शासन करते.
नसता तुम्ही गुन्हेगारबाळाला असे उघड्यावर फेकून देणाऱ्या पालकांवर भादंवि ३१७ अंतर्गत गुन्हा दाखल होतो. यात ७ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.जिल्ह्यात वयोगट ० - ६ बाळांचा सांभाळ करण्यासाठी २ संस्था असून, ६ ते १८ वयोगटातील मुलांसाठी १४ संस्था आहेत.
जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ नकामुलं नको असण्यास समितीकडे सोपवून त्याला त्याचा जगण्याचा अधिकार द्या. त्याला कुटुंब मिळेल. शिक्षण मिळेल. यात जन्मदात्यांची ओळख कायम गोपनीय ठेवली जाते.- ॲड. आशा शेरखाने कटके, अध्यक्ष, बालकल्याण समिती.