छत्रपती संभाजीनगर : वर्षभर कारागृहात राहून बाहेर आलेल्या कुख्यात गुन्हेगाराने घरापर्यंत रॅली काढल्याची घटना ताजी असताना जामिनावर सुटलेल्या दुसऱ्या गुन्हेगाराने शंभुनगरात तलवार उपसून व्यापाऱ्यांना दिवाळीची खंडणी मागितल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. निवडणुकीमुळे पथसंचलन, नाकाबंदीसाठी रोज शेकडो पोलिस रस्त्यावर असतानाही गुन्हेगार राजरोस गुन्हे करत असल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रेकॉर्डवरील गावगुंड शेख जावेद ऊर्फ टिप्या शेख मकसूद याने कारागृहातून सुटताच रॅली काढून परिसरात आतषबाजी करत पोलिसांना आव्हान दिले. ही घटना ताजी असतानाच शंभुनगरात रेकॉर्डवरील गुन्हेगार व्यापाऱ्यांना खंडणी मागत फिरत होता. त्याचा व्हिडीओ वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर कानउघडणी झाली व जवाहरनगर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. इलेक्ट्रिकल व्यावसायिक पंकज जिनवाल १९ ऑक्टोबर रोजी रात्री दुकानात हाेते. गुन्हेगार आदिल शाहरुख शेखने तेथे जात पैशांची मागणी केली. जिनवाल यांनी नकार देताच हवेत तलवार फिरवून ठार मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.
जामिनावर सुटूनही गुंडगिरी, वृद्धाला जिवंत जाळले होते२ जुलै रोजी याच आदिल, कृष्णा शिंदे (१९), शेख अय्याज शेख मुमताज (३०) यांनी महिपालसिंग रणधीर सिंग गौर (५७) या वृद्धाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्यांनी परिसरात खंडणी मागणे, धमकावण्याचे कृत्य सुरू केल्याने समोर आले आहे.
डॉक्टराला नाहक मारहाणनुकतेच एका स्वयंपाक्याला चाकू लावून लुटले होते. आता डॉ. नवनाथ धामने यांना तीन अज्ञातांनी रस्त्यात अडवून मारहाण करत धमकावले. २५ ऑक्टोबर रोजी रात्री ९:१५ वाजता धामने रुग्णालय बंद करून गारखेड्याच्या दिशेने जात होते. देवळाई उड्डाणपुलावर त्यांना अडवून मारहाण करण्यात आली. काही महिन्यांपासून शहरात राजरोस गुन्हेगारांचा उन्माद पाहायला मिळत आहे. यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरचा वचक कमी झाल्याचे दिसून येत आहे.