छत्रपती संभाजीनगर : कोरोनानंतर शहरवासीयांना मोठ्या आकारातील घराचे महत्त्व कळाले आहे. म्हणूनच तर आता घराच्या बाबतीत लोक अपग्रेड होत आहेत. याची प्रचिती बांधकाम व्यावसायिकांनाही येत असल्याने शहरात किफायतशीर दरांच्या घरासोबतच आता ३ बीएचकेपेक्षा अधिक आकाराचे फ्लॅट बनविले जात आहेत. हा बदल छत्रपती संभाजीनगरपुरता मर्यादित नसून देशातील मेट्रोसिटीतही दिसून येत आहे.
मागील दोन वर्षांत घडला बदलज्यांनी २ बीएचकेच्या फ्लॅटमध्ये कोरोना काळ काढला, तेव्हा मोठ्या आकारातील घराचे महत्त्व त्यांना कळाले. त्यातही लॉकडाऊन काळात ज्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ काम केले, त्यांना स्वतंत्र रूमची आवश्यकता भासू लागली. अनलॉकनंतर शहरातील नामांकित बिल्डरकडे ३ बीएचके, ४ बीएचके एवढेच नव्हे तर ५ ते ७ बीएचके फ्लॅटची मागणी वाढली. मागील दोन वर्षांत हा बदल दिसून आला.
बिल्डरांची पसंती मोठ्या आकारातील घरांनाभविष्याचा वेध घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनी नागरिकांची बदलती मानसिकता हेरली व त्यानुसार ३ बीएचके, ४ बीएचके लक्झरी घरांचे प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली.
जालना रोड, एन वन, समर्थनगर, उल्कानगरी महागड्या घरांचे प्रकल्प३ बीएचके, ४ बीएचके ते ७ बीएचके फ्लॅटला वाढती मागणी लक्षात घेता. जालना रोड, चिकलठाणा विमानतळ रोड, सिडको एन वन, चिकलठाणा औद्योगिक वसाहत, सिडको एन ३, एन ४, उल्कानगरी, ज्योतीनगर, काल्डाकॉर्नर परिसर, समर्थनगर, रेल्वे स्टेशन रोड, बन्सीलालनगर, बीड बायपास रोड या भागात मोठे अपार्टमेंट निर्माण होत आहेत.
३ बीएचकेची किंमत दीड कोटीपर्यंतशहरात ३ बीएचके फ्लॅटची किंमत सुमारे ८० लाख ते दीड कोटीच्या दरम्यान आहे. तर शहराबाहेरील परिसरात सुमारे ६५ लाख ते १ कोटी दरम्यान आहे. जमिनीच्या मूळ किमतीवर दर ठरविले जात आहेत. यामुळे काही भागात किमती यापेक्षा जास्तही असू शकतात.
४० टक्क्यांनी वाढली मागणीएकीकडे किफायतशीर दराची मागणी वाढत आहे, तर दुसरीकडे महागड्या घर खरेदीसाठीही ग्राहक तयार आहेत. शहरात आजघडीला लहान-मोठे ३०० बांधकाम व्यावसायिक आहेत. कोरोना काळानंतर ३ बीएचकेपेक्षा अधिक रूम असलेल्या फ्लॅटची विक्री ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षभरात जमिनीची मूळ किंमत वाढल्याने घरांच्या किमती १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.- विकास चौधरी,अध्यक्ष, क्रेडाई