छत्रपती संभाजीनगर: शहरातील आदर्श, मलकापूर आणि अजिंठा बँकेत अनेकांच्या ठेवी अडकल्या आहेत. पैसे परत मिळावे यासाठी शेकडो ठेवीदारांच्या सोबत आज सकाळी खासदार इम्तियाज जलील यांनी विभागीय आयुक्तालय येथे आंदोलन सुरू केले. दुपारी ३ वाजेदरम्यान आयुक्तांना निवेदन देण्यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याने आंदोलक आक्रमक झाले. यातच आंदोलक आयुक्तालयाच्या गेटवर अडून राहिल्याने एकच गोंधळ उडाला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या.
खा. जलील यांच्या नेतृत्वाखालील आदर्श सहकारी पतसंस्थेता, अजिंठा आणि मलकापूर बँकतील शेकडो ठेवीदारांनी आज सकाळी विभागीय आयुक्तालय परिसरात आंदोलन सुरू केले. आंदोलकांची संख्या वाढल्याने दुपारी विभागीय आयुक्तालयासमोरील रस्ता अडवला. तसेच निवेदन देण्यासाठी आयुक्तालयात प्रवेश घेण्यास निघाले. यावेळी काही आंदोलक बंद गेटवरून चढून आत प्रवेश करू लागले. परंतु, गेटवरच रोखण्याच्या प्रयत्न केल्याने पोलिस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे खासदार जलील देखील आक्रमक झाले. सध्या सर्व आंदोलक आयुक्तालय परिसरात ठिय्या देत आहेत. पोलिसांचे दंगा कापू पथक आयुक्तालयात दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
बंद दाराआड चर्चा नाही, विभागीय आयुक्तांनी बाहेर यावेपोलीस आयुक्त, डी.डी आर यांना बोलवा, एसी कॅबिन सोडून बाहेर या, नाही तर सर्व लोक आत येतील. अश्रुधुराचे नळकांडे फोडण्याचा आदेश कुणी दिला? हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत काय? वयोवृद्ध, महिला यांचा विचार सुध्दा केला नाही. दंगा करण्यासाठीं ते आले नव्हते. लिखित आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही आणि तुम्हालाही बाहेर पडू देणार नाही. गरज पडली तर लाठीकाठी नाही गोळ्या खायला देखील आम्ही तयार आहोत.सरकार वरचा विश्वास उडाला त्यामुळे लेखी आश्वासन हवे. मंत्री मंडळ बैठकी वेळी दोन मंत्र्यांनी दीड महिन्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजून काहीच झाल नाहीं. असे खासदार इम्तियाज जलिल म्हणाले.