छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाने गोरगरीब नागरिकांसाठी ‘आपला दवाखाना’ सुरू करण्याचे निर्देश दिले. महापालिकेने आतापर्यंत पाच ठिकाणी ‘आपला दवाखाना’ सुरू केला. त्याला रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. २३ हजार रुग्णांनी बाह्य रुग्णसेवेचा लाभ घेतला. ३ हजार रुग्णांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या. ‘आपला दवाखाना’च्या कक्षा आणखी विविध वसाहतींमध्ये वाढविण्याचा मनपाचा मानस आहे.
मागील तीन दशकांमध्ये महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आरोग्यसेवा, शिक्षण या मूलभूत गोष्टींकडे लक्षच दिले नाही. कोरोनानंतर मनपा प्रशासनाने स्वत:च्या निधीतून आरोग्य केंद्रातील मूलभूत सोयी सुविधा वाढविण्यास सुरुवात केली. प्रत्येक आरोग्य केंद्राला १ कोटीचा निधी दिला. दिल्लीच्या धर्तीवर आरोग्य केंद्र सक्षम करण्याचे काम सुरू आहे. शहरात मनपाचे ३९ आरोग्य केंद्र, ५ दवाखाने आहेत. आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत बाह्य रुग्णसेवा मिळत होती. कामावर गेलेल्या गोरगरीब रुग्णांना सायंकाळी दवाखान्यात जायचे असेल तर खाजगीशिवाय पर्याय नव्हता. अलीकडेच राज्य शासनाने आपला दवाखाना सुरू करण्याचे निर्देश दिले. दुपारी २ ते रात्री १० पर्यंत हे दवाखाने सुरू ठेवा, असेही सांगितले.
रुग्णांकडून चांगला प्रतिसादशहरात पहिला दवाखाना १ मे रोजी पडेगाव येथे सुरू करण्यात आला. पाच महिन्यांत तब्बल १० हजार रुग्णांनी लाभ घेतला. दुसरा दवाखाना २६ जूनला सावित्रीनगरला सुरू केला. तेथेही अडीच हजार रुग्णांनी हजेरी लावली. राजनगर येथे जवळपास ७ हजार रुग्णांनी हजेरी लावली. विटखेडा, हर्षनगरलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
औषधीही उपलब्धआपला दवाखानामध्ये बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषध खरेदी करण्याची सहसा गरज पडत नाही. बहुतांश औषधे मनपाकडून देण्यात येतात. त्यामुळे रुग्णसंख्या भरपूर असते.
लवकरच आमूलाग्र बदलशहरात महापालिकेची आरोग्य सेवा पूर्वीच्या तुलनेत अधिक सक्षम दिसून येईल. काही ठिकाणी डागडुजीची कामे सुरू आहेत. मेल्ट्रॉन हॉस्पिटलही सुरू होईल. ‘आपला दवाखाना’च्या कक्षाही भविष्यात आणखी रुंद होतील.- डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.
आपला दवाखानाचा तपशीलदवाखाना- बाह्य रुग्ण- लॅब तपासण्या- गरोदर तपासणी- प्रसूतीनंतर तपासणी-टेली मेडिसिनपडेगाव-९,९३३--१४११--१०-०१-००सावित्रीनगर- २,३६७--२३९-२३-०४-०२राजनगर- ६,७८१-११२५-३९-१६-५४विटखेडा-२,९१९-१४२-१२-०१-४०हर्षनगर-११०१-०४-०२-००-००