छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेतर्फे शहरात बेघर, दिव्यांग, आजारी, वृद्ध व्यक्तींसाठी पाच ठिकाणी शहरी बेघर निवारागृहे चालवली जातात. येथे राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनातील अंध:कार दूर होवो, याच भावनेतून प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून ‘आली माझ्या घरी दिवाळी’ हा उपक्रम मोतीकारंजा येथील जीवन जागृती शहरी बेघर निवारागृहामध्ये राबविण्यात आला.
शहरातील सर्व निवारागृहांमध्ये राहणाऱ्या २०० बेघर नागरिकांना मोतीकारंजा येथे आणून दिवाळी उत्सव, मिठाई वाटप आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपायुक्त नंदा गायकवाड, जागृती वैद्यकीय व सामाजिक संस्थेच्या डॉ. निखत पटेल, संत गाडगे महाराज क्रीडा शिक्षण व सांस्कृतिक मंडळाच्या मंजू गायकवाड, तेजस्विनी वस्ती स्तर संघाच्या भाग्यश्री देवतवाल, बोधी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या डॉ. रंजना दंदे, समूह संघटिका ललिता दाभाडे, डॉ. मनोज माळी, पूजा पंडित, विद्या आकोडे उपस्थित होते. यावेळी बेघर नागरिकांनी मनोगत व्यक्त करून आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.
ज्युनियर चार्ली सोमनाथ स्वभावणे आणि सुमित पंडित यांनी बेघर नागरिकांचे मनोरंजन केले. त्यांना नृत्यात सहभागी करून घेतले. यानंतर मिठाई आणि भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक प्रा. प्रशांत दंदे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रशांत गायकवाड यांनी केले. डॉ. फारूक पटेल यांनी आभार मानले. रोहित रत्नपारखी, रवी डॅनियल, आकाश बेलकर, अनिकेत देवतवाल यांनी परिश्रम घेतले.