छत्रपती संभाजीनगर : दुधाच्या उत्पादन वाढीसाठी गाय-म्हशींची प्रजनन क्षमता वाढविणे तसेच भाकड जनावरांवर उपचार करुन त्यांची उत्पादन क्षमता विकसित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गुरूवारपासून वंध्यत्व निवारणाची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात अशा २५ हजार २८८ जनावरांवर वंध्यत्व उपचार केले जाणार आहेत. लम्पी आजाराची साथ आटोक्यात आल्यामुळे विभागाने वंध्यत्व निवारण शिबिरावर भर दिला आहे.
भाकड व वंध्यत्व पशुधनावर उपचार करुन ते उत्पादनात आणता यावेत, यासाठी ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखाना, तालुक्याच्या ठिकाणी तसेच गावपातळीवर असलेले लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयांच्या कार्यक्षेत्रात ही शिबिरे होणार आहेत. त्यासाठी २५ हजार २८८ एवढी भाकड जनावरे निश्चित केली असून त्यांच्यावर उपचार करून उत्पादनात आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
पशू प्रजननाशी अपेक्षित शारीरिक वजन व वाढ याचा थेट संबंध आहे. कमी वजन अथवा वाढ होत नसलेल्या जनावरांमध्ये प्रामुख्याने वंध्यत्वाची शक्यता असते. त्यांना आपल्याकडे भाकड जनावरे, असे संबोधले जाते. अशा जनावरांची तपासणी करून संतुलित पशुआहार, खनिज मिश्रण पोषक आहार देण्यासंबंधी पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये तज्ज्ञ टीमद्वारे सर्व गायी-म्हशींची तपासणी करण्यात येऊन योग्य ते उपचारही करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात ११ लाख पशुधनयासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले की, जिल्ह्यात सर्व मिळून ११ लाख पशुधन असून यात गाय व म्हैस वर्गीय जनावरांची संख्या ६ लाख ३३ हजार एवढी आहे. यापैकी उत्पादनात नसलेल्या (भाकड) पशुधनाची संख्या २५ हजार २८८ एवढी आहे. या भाकड जनावरांवर उपचार करून त्यांची उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. पशुपालकांनी १९ डिसेंबर चालणाऱ्या वंध्यत्व निवारण शिबिरांमध्ये आपल्याकडील भाकड जनावरांवर उपचार करुन घ्यावेत.