छत्रपती संभाजीनगर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा या शहरात भडकलगेट समोर ६० ते ७०च्या दशकात बसविण्यात आला. आता याठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याची तिसऱ्यांदा उंची वाढविण्यात येत आहे. या निमित्ताने अनेकांना प्रश्न पडला असेल की, बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी सुरुवातीपासून हीच जागा का निवडली असेल. शहरातील बाबासाहेबांच्या पहिल्या पुतळ्याची कल्पना कोणाच्या मनात आली असावी. त्यासाठी काही आंदोलन झाले होते का?
या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला आहे. १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर चार-पाच वर्षांनी प्रा. एस. टी. प्रधान यांच्यासह आंबेडकरी समाजाने नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष द्वारकादास पटेल, सदस्य बाबूलाल पराती, दादाराव काळे, बाबूराव पटेल व अन्य सदस्यांकडे बाबासाहेबांच्या पुतळ्याची मागणी केली होती. बाबासाहेबांची ही कर्मभूमी असून, मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीनिमित्त त्यांचे येथे वास्तव्य असायचे. ते महान कायदेपंडित, जागतिक पातळीवरील थोर अर्थतज्ज्ञ व संविधान निर्माते असल्याची जाण असलेल्या नगरपरिषदेने ६० ते ७०च्या दशकात भडकलगेट येथे बाबासाहेबांचा अर्धपुतळा बसविला. मिलिंद महाविद्यालयाकडे जाण्याचा प्रमुख मार्ग देखील हाच होता. आजूबाजूला आंबेडकरी समाजाच्या वस्त्या होत्या. प्रामुख्याने भडकलगेट समोर चौकात समाजाचे विविध उपक्रम राबविले जायचे. सभा-संमेलनेही तेथेच व्हायचे. त्यामुळे बाबासाहेबांचा पहिला पुतळा तेथे उभारण्यात आला.
त्यानंतर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अलफ खान असताना रतनकुमार पंडागळे हे सदस्य होते. १९८२ साली परिषदेची शेवटची स्थायी समितीची सभा होती. त्यात पंडागळे यांनी भडकलगेट येथे बाबासाहेबांचा पूर्णाकृती उभारण्यात यावा, औरंगपुऱ्यात महात्मा फुले व मिल कॉर्नर येथे राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती उभारण्याची मागणी केली. १९८८ साली महापालिका अस्तित्वात आली. तत्पूर्वी, नगरपरिषदेचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला होता. पंडागळे हे नंतर मनपाच्या स्थायी समितीचे सभापती झाले. त्यामुळे त्यांनी या तिन्ही पुतळ्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. त्यानंतर १९९१ साली तत्कालीन महापौर प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यकाळात भडकलगेट समोरचा बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा काढून तेथे पूर्णाकृती पुतळा बसिवण्यात आला. या पुतळ्याचे उद्घाटन भदन्त ग. प्रज्ञानंद महाथेरो यांच्या हस्ते झाले. ते बाबासाहेबांच्या धर्मांतर सोहळ्यात उपस्थित होते. तत्कालीन विभागीय आयुक्त बी. एन. मखिजा, मनपा आयुक्त मुन्शीलाल गौतम, उपमहापौर मुजिब आलमशाह, स्थायी समितीचे सभापती पंडागळे हे उपस्थित होते. आजही तो पहिला अर्धाकृती पुतळा प्रगती कॉलनी येथील मनपाची शाळा आज त्या शाळेत बुऱ्हाणी नॅशनल हायस्कूलचे वर्ग भरतात. त्या परिसरात उभारण्यात आलेला पाहायला मिळतो.
विधिवत पुतळ्याचे स्थलांतरणभडकल गेट समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची उंची वाढविणे व पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रयत्नातून शासनाने ५ कोटींचा निधी दिला आहे. माजी नगरसेवक गंगाधर ढगे यांनी २०१९ मध्ये महापालिकेत पुतळ्याची उंची वाढविण्यासाठी ३ कोटींची मागणी केली होती. मात्र, मनपाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे ती मागणी पूर्ण होऊ शकली नव्हती. पुढे ढगे व चळवळीतील कार्यकर्त्यांनी आमदार जैस्वाल यांच्याकडे ही मागणी लावून धरली होती. २४ जून रोजी सायंकाळी पुतळा स्थलांतरणापूर्वी भन्ते नागसेनबोधी व भिक्खुसंघाने बुद्धवंदना घेतली. यावेळी आ. जैस्वाल, माजी नगसेवक गंगाधर ढगे, संजय जगताप, विजय मगरे, ॲड. खिल्लारे, डॉ. संदीप जाधव, किशोर गडकर आदींसह आंबेडकरी चळवळतील कार्यकर्ते, पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर आणि शिंदेसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, आ. जैस्वाल यावेळी म्हणाले की, बाबासाहेबांचा हा पुतळा संसद भवनाच्या संकल्पनेवर उभारला जाईल. पुतळ्याची उंची मोठी असेल. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी येणाऱ्या १४ एप्रिलपूर्वी हे काम पूर्ण झाले पाहिजे, अशी मागणी केली. त्यावर जैस्वाल व कार्यकारी अभियंता येरेकर यांनी पुतळ्याचे गुणवत्तापूर्ण काम काळजीपूर्वक केले जाईल. घाईगडबडीत काम उरकले जाणार नाही. पुतळा उभारण्यासाठी समाजातील जाणकार मंडळींची समिती नेमली जाईल. ही समिती या कामावर लक्ष ठेवेल, असे सांगितले. यावेळी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्यासह समर्थकांनी महामानवाच्या पुतळ्याची व अशोक स्तंभाची उंची वाढविण्यात यावी, अशी घोषणाबाजी केली.