छत्रपती संभाजीनगर : मुंबईच्या घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यातील सर्व होर्डिंग आणि दुभाजकांत उभेे केलेल्या युनिपोलचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पावला-पावलांवर युनिपोल यमदूतासारखे उभे करण्यात आले आहेत. हवामान बदलताच वादळ-वारे कधीही घोंघावू लागले. सोसाट्याचा वारा वाहू लागला; तर हे युनिपोल अजिबात कोसळणार नाहीत, याची गॅरंटी कोणीही द्यायला तयार नाहीत. छत्रपती संभाजीनगर शहरात युनिपोलची संख्या जवळपास ३०० पर्यंत पोहोचली आहे, हे विशेष.
सोशल मीडियामुळे होर्डिंग व्यवसायाला बऱ्यापैकी फटका बसला तरी या क्षेत्रातील एजन्सीधारकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे होर्डिंग उभारणे सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुभाजकात एका लोखंडी पोलवर २४ बाय १२ आकाराचे होर्डिंग उभारले. याची उंची साधारण २० फुटांपर्यंत असते. वजन ८०० ते १००० किलो असते. होर्डिंगचेच निकष महापालिका, स्मार्ट सिटीने युनिपोलला लावले आहेत. यातून महापालिकेला खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते असेही नाही. एका युनिपोलमागे महापालिकेला वर्षाला फक्त १५ हजार रुपये मिळतात. स्मार्ट सिटीनेही मोठ्या प्रमाणात अशा युनिपोल उभारणीला परवानगी दिली. ही परवानगी देताना महापालिकेला विचारलेही नाही.
पाहता-पाहता शहरात अशा पद्धतीचे ३०० पेक्षा अधिक युनिपोल विविध एजन्सीधारकांनी उभे केले. मागील महिन्यात वादळी वाऱ्याने शहरात ८०पेक्षा अधिक झाड उन्मळून पडले. शहानूरमियाँ दर्गा रोडवर एक युनिपोलचा भागही कोसळला. सुदैवाने तेव्हा रस्त्यावर कोणीही नव्हते. महापालिका प्रशासन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. युनिपोल उभारणीत वाहतूक पोलिसांची साधी एनओसीसुद्धा घेतली जात नसल्याची बाब समोर आली. शासनाने ठरवून दिलेल्या निकषांचे उघडपणे उल्लंघन होत आहे.
युनिपोलजवळ कोणी उभे राहत नाहीवादळी वारा, पाऊस सुरू झाल्यावर दुभाजकाजवळ कोणी उभे राहत नाही. आजपर्यंत युनिपोल कोसळल्याची घटना घडली नाही. त्याचे बेसमेंट खूप मजबूत असते. वाहनाचा धक्काही लागला तरी युनिपोल कोसळू शकत नाही. महापालिकेने, स्मार्ट सिटीने एजन्सीधारकांकडून स्टॅबिलेट सर्टिफिकेट घ्यावे. काढून टाकणे हा उपाय नाही. त्यावर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.- शेख हबीब, अध्यक्ष, होर्डिंग असोसिएशन