छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परीक्षा विभाग सातत्याने एका प्रकारे चर्चेत राहिलेला आहे. परीक्षा व मूल्यमापन व्यवस्थापनाबाबत गांभीर्य नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने परीक्षेच्या पहिल्याच दिवसी २१ मार्च रोजी परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांचा पदभार काढला असून आज शुक्रवारी डॉ. भारती गवळी यांनी तो पदभार स्वीकारला आहे.
यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. मंझा यांच्या परीक्षा विभागातील एकंदरीत कारभारावर मागील काही दिवसांपासून कुलगुरू नाराज होते. २१ मार्च रोजी पदवीच्या परीक्षांना सुरुवात झाली. तेव्हा पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वेळेत मिळाले नाही. त्यामुळे काहीजणांना पीआरएन नंबर परीक्षा द्यावी लागली. काही विद्यार्थ्यांना चुकीचे हॉल तिकीट मिळाले. त्या विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था एका महाविद्यालयात आणि हॉल तिकिटावर दुसरे महाविद्यालय मुद्रित झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी धावपळ झाली. परीक्षा संबंधी काही समस्या निर्माण झाली, तर त्या तात्काळ सोडविण्यासाठी या विभागात समन्वयाचा अभाव होता.
यासंबंधी अनेक प्राचार्यांनी कुलगुरूंकडे तक्रारी केल्या होत्या. परीक्षेसंबंधीच्या व्यवस्थापनात ही अनेक गंभीर चुका झाल्याचा डॉ. मंझा यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. पंधरा-वीस दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ डॉ. मंझा यांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा ते कार्यालयीन कामानिमित्त कुलगुरूंकडे जात असल्याचे सांगून शिष्टमंडळाला न भेटताच निघून गेले. त्यामुळे संतप्त शिष्टमंडळाने त्यांच्या खुर्चीला हार घातला. ही बाब त्यांच्या जिव्हारी लागली आणि दोन आठवडे त्यांच्या कार्यालयात न बसता परीक्षा मंडळाच्या सभागृहात बसूनच त्यांनी कारभार चालवला. याशिवाय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासण्याचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता. तो राबविण्यात ही ते अयशस्वी ठरले. या सर्व गोष्टींमुळे विद्यापीठ प्रशासनाने त्यांची परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या संचालक पदावरून उचलबांगडी केल्याचे बोलले जात आहे.
आता फक्त उपकूलसचिवांची जबाबदारीया घडामोडी संबंधी डॉ. गणेश मंझा यांनी सांगितले की, प्रशासनात अशा गोष्टी घडतच असतात. आपण त्या पदाचा सात-बारा केला नव्हता. व्यवस्थापनात असे बदल होतच असतात. आता आपल्याकडे परीक्षा विभागाच्या उपकूलसचिव पदाची जबाबदारी आहे. विद्यापीठ व्यवस्थापनाने १७ महिन्यानंतर डॉ. मंझा यांच्याकडील परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक पद तडकाफडकी काढून घेतले. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. तत्कालीन संचालक डॉ. योगेश पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर २९ ऑक्टोबर २०२१ रोजी डॉ. मंझा यांनी या पदाची सूत्रे घेतली होती.