छत्रपती संभाजीनगर : सुसाट वेगात जाणाऱ्या बुलेटने मोपेडस्वारास दिलेल्या जोरदार धडकेत विद्यापीठाचा कर्मचारी ठार झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाच्या परिसरात घडला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.
लक्ष्मण कचरू साठे (५७, रा. भावसिंगपुरा, मुळ रा. माळीवाडा ) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साठे हे भौतिकशास्त्र विभागात माळी पदावर कार्यरत होते. विभागातील गार्डनचे काम संपवून ते मोपेडवरून (एमएच २० डीपी २२०३) जात होते. तेव्हा भरधाव वेगात येणाऱ्या बुलेटने (एमएच १२, इएल ४४२८) त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत साठे गंभीर जखमी झाले. तेव्हा बुलेटस्वराने घटनास्थळावरून पळ काढला. त्याठिकाणी उपस्थित नागरिकांनी जखमी साठे यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. साठे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मध्यरात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लक्ष्मण साठे यांचे बंधु हरिश्चचंद्र यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुलेटस्वार हर्ष प्रकाश शिंदे (रा. सिंदीबन, ब्रिजवाडी) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. अधिक तपास उपनिरीक्षक विशाल बोडखे करीत आहेत.
भरधाव वेगाच्या वाहनांचा धुमाकूळविद्यापीठ परिसरात वाहने सुसाट वेगाने धावतात. प्रशासनाने वेगमर्यादेचे फलक लावले असले तरी वाहनधारक नियमांचे पालन करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यापीठात वेगामुळे सतत अपघात होत आहेत. या वेगवान वाहनचालकांवर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
दोन महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांच्या अंगावर कारमैत्रिणीसोबत गप्पा मारत असताना बेशिस्तपणे कार चालवणाऱ्या तरुणाने तीन विद्यार्थ्यांच्या अंगावरच कार घातली होती. त्यात तिघेही जखमी झाले होते. हा अपघात वनस्पतीशास्त्र विभागासमोर झाला होता.