फुलंब्री : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना येथे येथे आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ फुलंब्री तालुक्यात दोन ठिकाणी आंदोलन करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील पाल फाटा येथे सकाळी 11 वाजता एका कार्यकर्त्याने आपली स्वतःच्या कार जाळून निषेध व्यक्त केला.
जालना येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर शुक्रवारी झालेल्या लाठीचार्जचे पडसाद सर्वत्र पाहायला मिळत आहेत. शहरात देखील आज सकाळी फुलंब्री टी पॉइंट येथे काहीकाळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर काही कार्यकर्ते जळगाव महामार्गावर पाल फाटा येथे पोहचले. यावेळी आंदोलक ताठ गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी रस्त्याच्या मध्यभागी स्वतःची कार ( एम एच 20 एफ वय 4964) लावून आग लावत लाठीचार्जचा निषेध केला. दरम्यान, माहिती मिळाताचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मंगेश साबळे व साईनाथ बेडके याना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ला आणले.