गंगापूर (जि. औरंगाबाद) : गौण खजिन्यावर डोळा ठेवून महसूल यंत्रणेला न जुमानता अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांना तहसील प्रशासनाने दुसऱ्यांदा दणका दिला आहे. तालुक्यातील वाळूज मंडळातील आसेगाव येथील वाळू माफियांना शेहचाळीस कोटीचा दंड ठोठावून त्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवण्यात आला आहे.
वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी ही मोहीम तीव्र करणार असून,वेळ पडल्यास संबंधितांच्या जमिनीच्या लिलावातून दंड वसूल करणार असल्याचे तहसीलदार सतीश सोनी यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात याच मंडळातील आसेगाव,कासोडा, तळेसमान,नांदेडा व मुस्तफाबाद येथील एकूण २७ वाळू माफियांच्या सातबाऱ्यावर महसूल प्रशासनाने ६ कोटींचा बोजा टाकला होता तेव्हाच या कारवाईचे संकेत देण्यात आले होते. तालुक्यातील आतापर्यंतची हि सर्वात मोठी कारवाई असून यामुळे तालुक्यातील इतर वाळू माफियांना तात्पुरता वचक बसणार असला तरी याविरोधात कायमस्वरूपी व ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. गौणखनिज माफियांवर अनेकदा कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. परंतु ते प्रशासकीय यंत्रणेला न जुमानता पुन्हा नव्या जोमाने अवैध वाळू उपसा करत असल्याची स्थिती आहे. अशाच मुजोर व प्रशासनाला कोणतीही दाद न देणाऱ्या वाळूज मंडळातील आसेगाव शिवारातून केवळ तीन वाळू चोरांनी एकूण १६ हजार १३८ ब्रास वाळूचा अवैध उपसा केला आहे.तर याच शिवारातील दोघांनी ६७५ ब्रास मुरुमाचा अवैध उपसा केला आहे.अवैधरित्या वाळूचे उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना नियमानुसार बाजार मूल्यापेक्षा पाचपट अधिक दंड आकारण्यात येतो.त्याआधारे तहसीलदार सतीश सोनी यांनी संबंधित वाळू चोरांना जोरदार दणका दिला आहे. या कारवाईत पाच जणांच्या सातबाऱ्यावर तहसीलदार सतीश सोनी यांनी कारवाई करून एकूण ४६ कोटी १९ लाख ३६ हजार ३८० रुपयांचा दंड ठोठावून बोजा चढवला आहे. लाखोंचा दंड आकारल्याने वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे. या कारवाईचे नागरिकांमध्ये स्वागत करण्यात येत आहे तर वाळू माफियांत खळबळ माजली आहे.
एकाच मंडळात सर्वाधिक वाळू चोरी
यापूर्वी मागच्या महिन्यात याच वाळूज मंडळातील २७ जणांना महसूल प्रशासनाने दंड ठोठावून दणका दिला होता; त्यांनतर पुन्हा याच मंडळातील आसेगाव येथे हि सर्वात मोठी कारवाई झाली असून येथे गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू व मरूम चोरी होत असल्याचे यानिमित्ताने सिद्ध झाले असून लागूनच असलेल्या वाळूज औद्योगिक वसाहतीत या वाळूचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्यात येत असल्याचा अंदाज आहे येथे वाळू माफियांचे मोठे रॉकेट असल्याचे बोलले जात आहे मात्र हे रॅकेट आतापर्यंत कोणाच्या आशिर्वादाने राजरोसपणे वाळूची चोरटी वाहतूक करत होते याची चौकशी होणे गरजेचे आहे तसेच या माफियांना व त्यांची साखळी असलेल्या सर्वांना कायमस्वरूपी पायबंद घालण्यासाठी ठोस कारवाईची मागणी यानिमित्ताने करण्यात येत आहे.
यांना ठोठावला दंड १) अहेमद उस्मान पठाण रा.आसेगाव; ८११२ ब्रास मातीमिश्रित वाळू उपसा. दंड २५ कोटी ४४ लाख ४९ हजार १०४ रु
२) शेख जेहुर शेख कासम रा.आसेगाव ;१७२८ ब्रास मातीमिश्रित वाळू उपसा. दंड ५ कोटी ४२ लाख २ हजार १७६ रु.
३) शे.हनिफ शे.कासम रा. आसेगाव;६३०० ब्रास माती मिश्रित वाळू उपसा. दंड १९ कोटी ७६ लाख १२ हजार १०० रु.
४) अजमल खान अब्बास खान पठाण व एजाज खान अब्बास खान पठाण रा.आसेगाव ६७५ ब्रास मुरूम उपसा. दंड .४४ लाख ५५ हजार रु.
दंड भरावाच लागेल वाळूमाफियांना दंड वसुलीसाठी तातडीने रीतसर नोटीस पाठवली होती त्याअनुषंगाने त्यांनी तहसिल कार्यालयात लेखी खुलासा केला मात्र सदरील खुलासा असमाधानकारक असल्याने दंड भरावाच लागणार आहे संबंधितांनी दंड भरला नाही तर त्यांच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव करून दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल. - सतीश सोनी, तहसीलदार, गंगापूर