वाळूज महानगर (औरंगाबाद ) : सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी औरंगपूर- हर्सुली येथे घडली. सासरच्या मंडळींना अटक करण्याच्या मागणीसाठी विवाहितेच्या माहेरच्यांनी बुधवारी वाळूज ठाण्यासमोर पाच तास ठिय्या दिला. याप्रकरणी विवाहितेचा पती अक्षय शिंदे यास अटक करण्यात आली असून, सासू- सासऱ्यास अटक करण्याचे आश्वासन दिल्यावर नातेवाइकांनी अंत्यसंस्कार करण्याची तयारी दाखवली.
प्रांजली रामचंद्र मनाळ (रा. वाहेगाव) हिचा विवाह वर्षभरापूर्वी अक्षय शिंदे (रा. औरंगपूर-हर्सुली) याच्यासोबत थाटामाटात पार पडला होता. लग्नानंतर दोन महिने चांगले नांदविल्यानंतर सासरच्यांनी प्रांजलीचा छळ करण्यास सुरुवात केली. पती अक्षय सतत मारहाण करीत असे. शेती खरेदीसाठी माहेराहून ७ लाख रुपये आणण्यासाठी प्रांजलीचा पती अक्षय, सासरे तात्याराव शिंदे व सासू कमलबाई शिंदे हे सतत तिचा छळ करत. प्रांजलीने माहेरी येऊन सांगितले. मात्र, आई- वडील व नातेवाइकांनी समजूत काढून तिला सासरी नेऊन सोडले.
विहिरीत सापडले प्रांजलीचे प्रेतप्रांजलीला सासरी सोडल्यानंतर पाच दिवसांनी १ मार्चला सायंकाळी तिचे सासरे तात्याराव शिंदे यांनी तिच्या माहेरी संपर्क साधून प्रांजलीने विहिरीत उडी मारल्याचे सांगितले. प्रांजलीच्या माहेरच्यांनी येऊन गावातील नागरिक व पोलिसांच्या मदतीने तिला विहिरीतून बाहेर काढून गंगापूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
आरोपींच्या अटकेसाठी पाच तास ठिय्याप्रांजलीने आत्महत्या केली नसून, सासरच्या मंडळींनी तिचा खून केल्याचा आरोप करीत बुधवारी दुपारी तिच्या माहेरचे नातलग वाळूज ठाण्यात आले. पती व सासू, सासऱ्याला अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेत त्यांनी ठिय्या दिला. प्रांजलीचे सासरे पोलीस खात्यात नोकरीला असल्याने त्यांना पोलीस वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पतीला अटक करण्यात आली असून, सासू-सासऱ्यासही लवकरच अटक करू, असे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले म्हणाले. जि.प. सदस्य मधुकरराव वालतुरे यांनी नातेवाइकांची समजूत काढल्याने नातलग अंत्यसंस्कारांसाठी तयार झाले.